शिवसेना नेते, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. रत्नागिरीत सामंत आणि फडणवीसांची गुप्त भेट झाल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूम पर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले. प्रसार माध्यमं काय भलतच दाखवत आहेत, कृपया दुरुस्ती करावी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 25, 2021
“तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही उदय सामंत देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत आले होते. त्या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली” असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने रत्नागिरीत येण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही भेट झाली का, भेट झाली असल्यास त्याचं नेमकं कारण काय, दोघांमध्ये नेमकी कसली चर्चा झाली, असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
हे ही वाचा:
ठाणे पोलीस आयुक्तपदी जयजित सिंग
भाजपाकडून कोकणच्या मदतीचा ओघ सुरूच
ट्विटरच्या दिल्ली, गुरगांव कार्यालयांवर छापे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच तीन दिवसांचा कोकण दौरा केला. देवगडमध्ये बंदरावर येऊन त्यांनी मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावला होता. “मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले? वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत? आम्हीही असाच सवाल करायचा का?” असा सवाल करतानाच “गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारनेही काहीही मदत केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेटं करत आहेत” अशी टीका फडणवीस यांनी केली होती.