मेघालयात मुख्यमंत्र्यांच्याच घरावर फेकले बॉम्ब आणि…

मेघालयात मुख्यमंत्र्यांच्याच घरावर फेकले बॉम्ब आणि…

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांच्या घरावर अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकले. रविवारी ही घटना घडली. काही अज्ञातांनी थेट मुख्यमंत्री कॉनराड राहात असलेल्या बंगल्याकडे धाव घेत, पेट्रोल बॉम्ब फेकले. रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. पेट्रोलने भरलेल्या दोन बाटल्या मुख्यमंत्र्यांच्या घराच्या दिशेने फेकण्यात आल्या.

दरम्यान, याप्रकरणात कोणालाही दुखापत झालेली नाही. पेट्रोलने भरलेली एक बाटली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या पुढच्या बाजूला तर दुसरी मागच्या बाजूला फेकण्यात आली. पेटती बाटली फेकल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवलं.

स्वातंत्र्य दिनी मेघालयची राजधानी शिलाँगसह परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने शिलाँगमध्ये कर्फ्यू लावला. इतकंच नाही तर मेघालयातील चार जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या.

दरम्यान या सर्व हिंसाचारात मेघालयचे गृहमंमत्री लखमेन रिंबुई यांनी राजीनामा दिला आहे. एका उग्रवाद्याला पोलिसांनी गोळी मारुन ठार केलं. त्यानंतर सर्वत्र हिंसाचाराला सुरुवात झाली.

हे ही वाचा:

राशीद खानचं कुटुंब संकटात?

‘या’ विमा कंपनीचे होणार खासगीकरण

अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्र सैन्य पाठवणार?

अफगाणिस्तानातील पुजारी म्हणतो मी देश सोडणार नाही… जाणून घ्या का ते..

गृहमंत्री रिंबुई यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे की “बंदी असलेली संघटना नॅशनल लिबरेशन काऊन्सिलचा महासचिव चेरिस्टरफील्ड थांगखियू याने आत्मसमर्पण केलं असतानाही त्याला गोळी मारण्यात आली, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी”

थांगखियूला १३ ऑगस्टला गोळी मारुन त्याला ठार करण्यात आलं. मेघालयात झालेल्या साखळी स्फोटातील आयडी स्फोटानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापेमारी केली होती. त्यावेळी त्याने पोलिसांवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

Exit mobile version