“ऐन गणपतीत मुंबई-पुण्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ठाकरे सरकारची ऐतिहासिक कामगिरी.” असं ट्विट करत भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी ७ हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. या काळात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी केले आहे.
पोलिसांकडून पुण्यात गणेशोत्सवासाठी यापूर्वीच आचारसंहिता जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार यंदा श्रींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नाहीत. गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी, ७०० अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियंत्रण कक्ष, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश असेल.
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी पुण्यात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात १० सप्टेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२१ पर्यंत कलम १४४ लागू असेल.
हे ही वाचा:
खरमाटे यांच्याकडे ७५० कोटींची प्रॉपर्टी
बारमेरमध्ये भारतीय हवाई दलाचा ‘हा’ नवा विक्रम
ऐन गणेशोत्सवात पुण्यात जमावबंदी
श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. ट्रस्टच्या १२९ वर्षात सलग दुसऱ्या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे.