पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या गोव्यातील उमेदवाराचा छत्तीसगडमधील प्रचारसभेदरम्यान समाचार घेतला. काँग्रेसचे गोव्यातील उमेदवार व्हिरिएटो फर्नांडिस यांनी भारताची राज्यघटना किनाऱ्यावरील राज्यांवर थोपवण्यात आल्याचे वक्तव्य केले होते. मोदी यांनी या वक्तव्याचा उल्लेख एक कट असा केला. धर्माच्या नावावर देशाची फाळणी करणारा काँग्रेस स्वातंत्र्यानंतर पहिल्याच दिवसापासून लांगुलचालन करू लागला, असा आरोपही मोदी यांनी केला.
‘काँग्रेसला देशाच्या एका मोठ्या भागाने लाथाडले आहे. यासाठी हा देश स्वतःची बेटे बनवू पाहतो आहे,’ असा आरोपही मोदी यांनी केला. ‘काँग्रेसला गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासी कुटुंबीयांची सत्तेतील भागीदारी पचू शकलेली नाही. त्यामुळे काँग्रेसने एक मोठा खेळ सुरू केला आहे. आधी कर्नाटकच्या काँग्रेसच्या खासदाराने दक्षिण भारताला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले जाईल, असे जाहीर केले. आता गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार म्हणत आहेत की, गोव्यावर देशाची राज्यघटना थोपवली जात आहे,’ असा आरोप मोदींनी केला. दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे उमेदवार व्हिरिएटो फर्नांडिस यांनी पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोव्यावर भारतीय राज्यघटना थोपवली गेल्याचे वक्तव्य केले होते.
‘त्यांनी (काँग्रेस उमेदवाराने) ही बाब काँग्रेसच्या राजकुमाराला सांगितली आहे. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान आहे की नाही? काँग्रेसचा उमेदवार म्हणतो की, गोव्यात देशाची राज्यघटना चालणार नाही. हेच जम्मू काश्मीरचे लोकही बोलत होते. मात्र तुम्ही आशीर्वाद दिला. त्यांची बोलती बंद झाली. आता तिथे भारताची राज्यघटना चालते,’ असे मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
क्रूर पाकिस्तानी दहशतवादी अबू हमजाविरोधात लूकआऊट नोटीस
कोरियामध्ये मशीद बांधण्याच्या माजी के-पॉप स्टार दाऊद किमच्या प्रस्तावाला स्थानिकांचा विरोध
‘जिथे हिंसाचार झाला तिथे निवडणुकांना परवानगी नाही’
भगवान रामाचा फोटो असलेल्या प्लेटमधून बिर्याणीची विक्री?
‘काँग्रेसचा उमेदवार सांगतो की, ही बाब त्याने आपल्या नेत्याला सांगितली आहे. याचा अर्थ त्याच्या नेत्याची त्याला मूक संमती आहे. हा देश तोडण्याचा समजून उमजून केलेला कट आहे. आज गोव्यातून राज्यघटना रद्दबातल करण्याबाबत बोलले जात आहे. उद्या संपूर्ण देशातून डॉ. बाबासाहेबांची राज्यघटना हद्दपार करण्याचे पाप केले जाईल,’ असा आरोप मोदी यांनी केला.