एककीकडे राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी दोनदा भेट घेऊन देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. दुसरीकडे विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पवारांनी कंबर कसलेली असतानाच प्रशांत किशोर यांनी मोठं विधान केलं आहे. तिसऱ्या आघाडीचं मॉडल गैरलागू आहे. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देईल असं वाटत नाही, असं किशोर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. किशोर यांचं विधान वस्तुस्थिती आहे की भाजपला गाफील ठेवण्यासाठी टाकलेली गुगली आहे? याबाबत वेगवेगळे कयास लगावले जात आहेत.
प्रशांत किशोर यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. मी तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तिसरी आघाडी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देईल, याचा मला विश्वास वाटत नाही, असं किशोर म्हणाले.
तिसऱ्या आघाडीचं मॉडेल वापरून झालं आहे. हे मॉडेल जुनं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीला हे मॉडेल अनुकूल नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी शरद पवारांशी झालेली भेट, त्याचे काढण्यात आलेले राजकीय अर्थ यावरही त्यांनी भाष्य केलं. पवारांची भेट घेतली. एकमेकांना जाणून घेण्यासाठी ही भेट होती. आम्ही कधीच एकत्र काम केलं नाही. त्यामुळे त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पवारांसोबतच्या बैठकांमध्ये केवळ राजकीय चर्चा होत असतात. प्रत्येक राज्यात भाजपच्या विरोधात कसं लढता येईल? कोणत्या गोष्टी उपयोगी पडतील आणि कोणत्या नाही, यावर या बैठकीत चर्चा होते, असं सांगतानाच संभाव्य तिसऱ्या आघाडीचं मॉडेल आतासाठी नाही. त्यांच्या योजनेत त्याचा समावेश नाही, असंही त्यांनी सांगितलं. पवार त्यांच्या प्रदीर्घ अनुभव आणि नेटवर्किंग कौशल्याने ओळखले जातात. तर मी राजकीय स्ट्रक्चर देऊ शकतो, असं ते म्हणाले.
हे ही वाचा:
महत्वाचे सामने इंग्लंडमध्ये घेऊ नयेत, इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूचे विधान
संजय राऊत हे शरद पवारांच्या पे रोलवर
मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार रुपये पाठवणार
देशात २४ तासात ८७ लाखांपेक्षा जास्त लसीकरण
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या विजयावरही त्यांनी भाष्य केलं. भाजपच्या विरोधात आपण उभं राहू शकतो. त्यांना आव्हान देऊ शकतो, हा संदेश ममता बॅनर्जी यांच्या विजयातून विरोधी पक्षांना गेला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.