देशभरात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे देशातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १८-४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण महाराष्ट्रात १ मे पासून होणार नाही हे सांगितले आहे. मोफत लसीकरणाची घोषणा करून सुद्धा ठाकरे सरकार लसीकरणच करणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे १ मे पासून १८-४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण न करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरणार आहे. राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावल्यास राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे राज्यासमोरील चिंतेत वाढ झाली आहे.
राज्यात १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार होते. पण लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आणि मृत्यू हे महाराष्ट्रात आहेत. त्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर सर्वांचं लसीकरण हाच पर्याय आहे. अशात लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा:
पुजाऱ्याला थोबाडीत मारणारा मुजोर जिल्हाधिकारी निलंबित
रश्मी शुक्लांना सीबीआय साक्षीदार बनवणार
महाराष्ट्रात आढळले ६३,३०९ नवे कोरोना रूग्ण
राज्यात आतापर्यंत १.५ कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण केलं जाणार आहे, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र एवढ्या सगळ्या नागरिकांचं लसीकरण करण्यास १ मे पासून आवश्यक लसी उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरीपर्यंत लसी कदाचित मिळू शकतात. त्यावेळी लसीकरण सुरु होऊ शकतं, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.