बृहन्मुंबई महानगरपालिकामार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरतीत केवळ मराठी माध्यमातून शिक्षण झाल्याने शिक्षकांना नाकारण्यात आले. याबाबत शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांनी मुंबई महानगरपालिकेला २१ जून रोजी पत्र लिहिले होते. मात्र एक महिना उलटूनही अपेक्षित उत्तर मिळाले नाही. येत्या १५ दिवसांत उत्तर न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा सूचक इशारा शिक्षण समिती सदस्य प्रतीक कर्पे यांनी दिला आहे.
केवळ मराठी माध्यमातून शिक्षण झाल्याने १५० शिक्षकांना बृहन्मुंबई महानगरपालिकामार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरतीत नाकारण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीत मार्च महिन्यात मांडला गेला होता. आज ४ महिने उलटूनही या प्रस्तावावर कोणतेही पाऊल उचलले गेले नाही.
याविषयी जाब विचारला असता संबंधित विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले जाते व महापालिकेला प्रस्ताव दिल्याचे राज्य सरकार सांगते. हे ढकलाढकलीचे राजकारण योग्य नसल्याचे कर्पे म्हणाले.
मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकारण करणारा शिवसेनेसारखा पक्ष राज्याच्या सत्तेत असला तरी मुंबईतील मराठी शिक्षकांना मात्र अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई महानगरपालिका शाळेत पवित्र पोर्टलवरून शिक्षक नियुक्ती केली जाते. यासाठी परीक्षा देखील घेतल्या जातात. मात्र, यातील धक्कादायक बाब म्हणजे इयत्ता दहावी मराठी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या १५० शिक्षकांना मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात रुजू करण्याबाबत टाळाटाळ केली जात होती.
हे ही वाचा:
सुवर्णविजेत्या नीरज चोप्राला मिळणार ही गाडी
किल्ल्यांच्या संवर्धनापेक्षा महसुलाच्या ‘किल्ल्यां’कडे लक्ष?
महारेराच्या काळ्या यादीत राज्यातील १ हजार १८० प्रकल्प
मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी आता टीशर्ट घाला
या प्रस्तावावर झालेल्या चर्चेत महानगरपालिका प्रशासन विशिष्ट हट्टापायी मराठीला बाजूला सारून इंग्रजी भाषेला प्राधान्य देण्यात येत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे शिक्षण समिती सदस्य प्रतीक कर्पे यांनी केला. यातून सत्ताधाऱ्यांच्या मराठी प्रेमाचा बुरखा फाटल्याची टीका कर्पे यांनी शिक्षण समितीत केली होती.