महाराष्ट्रातील हे नेते मोदी मंत्रिमंडळात निश्चित?

महाराष्ट्रातील हे नेते मोदी मंत्रिमंडळात निश्चित?

मी खासदार असल्याने दिल्लीत आल्याचं सांगून भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशाबाबतच्या प्रश्नांना बगल दिली. ही कालची घटना. आज मात्र, सकाळी सकाळीच नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पाटील-राणे कधीही महाराष्ट्रात कोणत्याही प्रश्नावर एकत्र आले नव्हते. आज दोघेही मोदींच्या भेटीला गेले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची मंत्रिपदे फिक्स झाल्याची जोरदार चर्चा आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी मोदींशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी हे दोन्ही नेते मोदींच्या निवासस्थानी आल्याची चर्चाही दिल्लीच्या वर्तुळात आहे.

भाजप नेते नारायण राणे यांना काल अचानक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोन आला. फोन येताच राणे गोव्याच्या दिशेने गेले आणि गोव्यावरून थेट दिल्ली गाठली. राणे दिल्लीत जात नाही तोच खासदार भागवत कराड आणि कपिल पाटील यांनीही दिल्लीकडे प्रयाण केलं. त्यामुळे महाराष्ट्रातील या तिन्ही नेत्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या चर्चांनी जोर धरला.

आज संध्याकाळीच मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे दिल्लीत लगबग सुरू झाली. राणे आणि पाटील यांनीही आज सकाळी ११ च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७ रेसकोर्सवर पोहोचले. यावेळी जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित आहेत. यावेळी मोदींनी या दोन्ही नेत्यांचं हस्तांदोलन केलं. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर राणे आणि पाटील यांनी मोदींचे आभार मानले असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या वृत्ताला राणेंनी अधिकृत दुजोरा दिला नाही. पण राणे आणि पाटील यांनी मोदींची घेतली. त्यानंतर भागवत कराड आणि हिना गावित यांनीही मोदींची भेट घेतली आहे. त्यामुळे अनेक संकेत मिळत असल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा:

एअर इंडिया, बीपीसीएल पाठोपाठ ‘या’ कंपनीचेही खासगीकरण

एकनाथ खडसेंचा जावई ईडीच्या ताब्यात

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं ९८ व्या वर्षी निधन

भास्कर जाधव नरकासूर, तर उद्धव ठाकरे सोंगाड्या

मोदी सरकारची ही दुसरी टर्म आहे. दुसऱ्या टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार आहे. मधल्या काळात शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाने भाजपशी काडीमोड घेत मंत्रिपदाचे राजीनामे दिले. त्यामुळे मंत्रिपदे रिक्त झाली आहेत. शिवाय लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांच्या निधनामुळेही एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे हा विस्तार होत आहे. त्यात महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, हिना गावित आणि कपिल पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे भाजपला मित्रपक्ष उरला नाही. परिणामी भाजपसमोर तीन पक्षाचं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपला मजबूत करून पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राला झुकते माप देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.

Exit mobile version