बंगालसाठी भाजपा-तृणमुलची जोरदार ‘फिल्डींग’! ‘हे’ क्रिकेटपटू सुरू करणार राजकीय इनिंग

बंगालसाठी भाजपा-तृणमुलची जोरदार ‘फिल्डींग’! ‘हे’ क्रिकेटपटू सुरू करणार राजकीय इनिंग
क्रिकेट आणि राजकारण हे भारतीयांसाठी जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यात क्रिकेट बोर्डावरचे राजकारणी आणि राजकारणातले क्रिकेटपटू पाहणे आपल्याला चांगलेच सवयिचे झाले आहे. क्रिकेटपटूंची राजकीय इनिंग ही देखील नवी बाब उरली नाही. राज्यसभेवर गेलेले सचिन तेंडुलकर, खासदार गौतम गंभीर, किर्ती आझाद, नवज्योत सिंह सिद्धू अशी अनेक उदाहरणे आहेत. या यादीत आता बंगालच्या दोन युवा क्रिकेटपटूंचा समावेश होत आहे.
अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या बंगालच्या निवडणूका दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत आहेत. भारतीय जनता पार्टीने आपल्या ‘मिशन बंगाल’ साठी जोर लावला आहे. तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील आपली सत्ता टिकवण्याचा आणि भाजपाला रोखण्याचा चंग बांधला आहे. भाजपा-तृणमुलच्या या चुरशीच्या सामन्याला आता क्रिकेटचा तडका मिळाला आहे. बंगालच्या एका युवा फलंदाजाने तृणमुलचा झेंडा हाती घेतला आहे तर एका युवा गोलंदाजाने हाती ‘कमळ’ धरले आहे.
हे युवा खेळाडू म्हणजे फलंदाज मनोज तिवारी आणि वेगवान गोलंदाज अशोक डिंडा.
२४ जानेवारी रोजी मनोज तिवारीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हुगळी जिल्ह्यातीर प्रचारसभे दरम्यान तृणमुलमध्ये प्रवेश केला. तिवारीने आपण नवीन सुरूवात करत असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी तिवारी याने भारताची बाजू घेऊन ट्विट करणाऱ्या क्रिकेटपटूंवर टीका केली होती.
अशोक दिंडानेही २४ तारखेलाच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपाच्या परिवर्तन यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांच्या उपस्थितीत दिंडाने आपला राजकीय प्रवास सुरू केला आहे.
मनोज तिवारी आणि अशोक दिंडा हे दोघेही भारताकडून क्रिकेट खेळले असले तरिही त्यांची कारकिर्द फारशी यशस्वी ठरली नाही. आता त्यांची ही राजकीय इनिंग यशस्वी ठरणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
Exit mobile version