उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत सात लहान पक्षांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. समाजवादी पार्टी (एसपी) आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (एसबीएसपी) नेत्यांनी बुधवारी मऊ येथे एका व्यासपीठावरून सभा घेतली. त्याचबरोबर त्यांनी घोषणा केली की ते २०२२ च्या निवडणुकीत एकत्रितपणे लढतील.
दरम्यान, सात लहान पक्षांचा समावेश असलेल्या ‘हिसेदारी मोर्चा’ने बुधवारी विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केला होता, असे भाजपाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बुधवारी सात पक्षांच्या नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना पाठिंबा देणारी पत्रे दिली होती. या नेत्यांमध्ये भारतीय मानव समाज पक्षाचे केवत रामधानी बिंद, मुसहर आंदोलन मंचचे चंद्र वनवासी आणि शोषित समाज पक्षाचे बाबुलाल राजभर यांचा समावेश आहे. मानव हित पार्टीचे कृष्ण गोपाल सिंग कश्यप, भारतीय सुहेलदेव जनता पक्षाचे भीम राजभर, पृथ्वीराज जनशक्ती पक्षाचे चंदन सिंह चौहान आणि भारतीय समता समाज पक्षाचे महेंद्र प्रजापती हे इतर नेते यामध्ये आहेत.
उत्तर प्रदेशमधील २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने एसबीएसपीशी युती केली होती. एसबीएसपीला आठ जागा देण्यात आल्या, त्यापैकी चार जागा त्यांनी जिंकल्या होत्या.
ओमप्रकाश राजभर यांना उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री करण्यात आले असले तरी त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी युती तोडली आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीनच्या नेतृत्वाखाली असदुद्दीन ओवेसी आणि इतर काही लहान पक्षांनी ‘भागीदारी संकल्प मोर्चा’ स्थापन केला.
हे ही वाचा:
एसटीला गळफास घेऊन आणखी एका चालकाने गमावले प्राण
रिझर्व्ह बँकेला तीन वर्षासाठी नवी ‘शक्ती’
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी मतभेद झाल्याच्या अफवांवर राजभर म्हणाले की त्यांनी ओवैसींशी चर्चा केली आहे आणि त्यांना नव्याने स्थापन झालेल्या युतीमध्ये सामील होण्याची विनंती केली आहे.