पोलीस विभागातील वाझे तर सापडला, पण अन्य विभागातील वाझेचा पत्ता आम्हाला लागला. म्हणून पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केलाय. ‘मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे’, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला सरकार म्हणता येईल का? असा सवालही त्यांनी केलाय. भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना, शेतकरी, मराठा, ओबीसी आरक्षण, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
महाराष्ट्रात सरकार म्हणून अस्तित्व कुठं आहे? मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाझे, ही अवस्था महाराष्ट्राची पाहायला मिळतेय. राज्याच्या इतिहासात भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचाराने बरबटलेलं सरकार आहे. अशी अवस्था गेल्या ६० वर्षात पाहिली नाही. कुठल्याही सरकारमध्ये १ मुख्यमंत्री असतो, पण या सरकारमध्ये प्रत्येक मंत्री मुख्यमंत्री समजतो, एक निर्णय घेतला जातो, तो तासाभरात रद्द होतो, मग दुसऱ्यादिवशी पुन्हा निर्णय घेतला जातो, सरकार आहे की सर्कस आहे? असा खोचक सवालही फडणवीसांनी विचारलाय.
कोव्हिडमुळे महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर, महाराष्ट्रात देशातले मृत्यू ३३ टक्के, ॲाक्सिजन नाही म्हणून लोकं मेली, या सरकारची पाठ थोपटतात त्यांना विचारावं वाटतं तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? कोरोना मुक्तीचं कुठल मॅाडेल आणलंय, कुणी आणलंय, कसं आणलंय, देशात कोव्हिडमुळे मेलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती महाराष्ट्रातील आहे. किड्या मुंग्यासारखे लोक मेले. उत्तर प्रदेशात गंगा नदीत मृतदेह आढळले म्हणून गोंधळ माजवला, पण बीडमध्ये एका रुग्णवाहिकेत २२ मृतदेह कोंबले, हे मॉडेल कुठलं? असा सवालही फडणवीसांनी केलाय.
मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का? नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे महाराष्ट्रात आहे का? मग कुठे आहे सरकार? नाशिक, नागपूर, औरंगाबादमध्ये एक कोविड सेंटर या सरकारनं काढलं का दाखवा? कोरोना काळात प्रत्येक खरेदीमध्ये भ्रष्टाचार पाहायला मिळाल्याचा गंभीर आरोपही फडणवीसांनी केलाय. राज्यात फक्त वसुली सरकार, १००-१०० कोटी रूपयांच्या वसुली, पोलिसातला वाझे सापडला, अजून वेगवेगळ्या विभागातले वाझे आहेत, त्यांचे पत्ते आम्हाला सापडले आहेत, आमच्याकडे त्यांचे पत्ते आलेत, त्यामुळे अधिवेशन गुंडाळलं. अधिवेशनापासून हे सरकार पळ काढतंय कारण असं केलं तर आपला भ्रष्टाचार बाहेर येईल, असा दावाही फडणवीसांनी केलाय.
हे ही वाचा:
स्वबळाची भाषा करणारे नाना पटोले दौरा अर्धवट टाकून दिल्लीला
मॅकॅफी अँटीव्हायरसचे संस्थापक जॉन मॅकॅफी आढळले मृतावस्थेत
मी दाव्याने सांगतो, कुठल्याही मंत्र्याने माझ्याशी डिबेट करावी, ओबीसी आरक्षण जायला फक्त या सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार. पिटीशन टाकणारे कोण, एक काँग्रेस आमदारांचा मुलगा आणि एक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष, ती पिटीशन हायकोर्टात आलं. पिटीशन ५० टक्क्यावरील आरक्षणाबाबत होती, बावनकुळेंना इन्चार्ज केलं, ५० टक्क्यांवरील आरक्षण आम्ही टिकवलं. मग ते सुप्रीम कोर्टात गेले. तिथे आम्ही म्हणणं मांडलंच, पण निवडणुका घेण्याचीही परवानगी पूर्ण आरक्षणासहित देण्यात आली. ५० टक्क्यावरील आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण थंबरुल होऊ शकत नाही असं कोर्टाने म्हटलं. आम्ही एका रात्रीत अध्यादेश काढला, तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला.