राज्यातील अनलॉकच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून घोषणा करतात. केवळ श्रेयवादासाठी या मंत्र्यांनी घोळ घालण्यास सुरुवात केली असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधत हा टोला लगावला आहे. राज्यात एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून घोषणा करत आहेत. कोणत्याही सरकारमध्ये पॉलिसी डिसीजन घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. एखाद्यावेळी मुख्यमंत्री अशा घोषणा करण्यासाठी मंत्री नेमतात आणि ते मंत्री सरकारच्या लाईनवर भाष्य करतात. पण या सरकारमध्ये एकाच विषयावर पाच पाच मंत्री घोषणा करत असतात. विशेष म्हणजे प्रत्येक मंत्री घोषणा करून ही घोषणा मुख्यमंत्री करणार असल्याचं सांगत आहेत. हे सगळं श्रेयासाठी सुरू आहे. हे काही पहिल्यांदाच घडत नाही. अनेकदा असं घडलंय. मंत्र्यांनी पाच पाच वेळा एकाच गोष्टीची घोषणा केल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी, असं सांगतानाच मेजर पॉलिसी डिसीजनवर सरकारचं म्हणणं स्पष्ट आणि थेट असावं, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.
राज्य सरकारने आधी अनलॉक जाहीर केला. नंतर घुमजाव केल्याने मला अनेकांचे फोन आले. लॉकडाऊन आहे की नाही आम्हाला विचारण्यात आलं. मात्र, आम्हाला या निर्णयाची माहिती नसल्याने आम्हाला त्यांना काही सांगता येत नव्हतं. पण मुख्यमंत्र्यांची प्रेसनोट अधिकृत असते. त्यावर विश्वास ठेवा, असं मी सांगितलं. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊननंतर काल लोकांची उत्सुकता वाढली होती. उत्कंठाही वाढली होती. संभ्रमही निर्माण झाला आणि निराशाही झाली. कालच्या घोषणेमुळे अनेक छोटे दुकानदार सुखावले होते, पण नंतर त्यांचा भ्रमनिरास झाला, असंही ते म्हणाले.
हे ही वाचा:
सुशांत सिंग राजपूत प्रकरण, अंगरक्षकही होणार साक्षीदार
ठाकरे सरकारमधील अनलॉक विसंवादाचा दुसरा अंक आज?
पॅरिसमध्ये विमानात स्फोटकं सापडल्याने खळबळ
कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट
सरकारने काही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र दुकानदारांना ही वेळ मान्य नाही. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असं दुकानदारांचं म्हणणं आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.