दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून यासाठी राजधानीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत सत्ताधारी असलेल्या आपने यापूर्वीचं त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करत ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले होते. दरम्यान, दिल्लीत आप आणि काँग्रेस यांची युती होईल का या चर्चांना आता स्वतः आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पूर्णविराम दिला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला पक्ष दिल्लीची विधानसभा निवडणूक एकटाच लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांनी आपला पक्ष काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते. आता त्यांनी काँग्रेससह इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याच्या शक्यतांना पूर्णपणे फेटाळून लावत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. “आम आदमी पार्टी ही निवडणूक दिल्लीत स्वबळावर लढणार आहे. काँग्रेससोबत कोणतीही युती होण्याची शक्यता नाही,” असे ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर केले आहे.
Aam aadmi party will be fighting this election on its own strength in Delhi. There is no possibility of any alliance with congress. https://t.co/NgDUgQ8RDo
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 11, 2024
‘इंडी’ या विरोधी पक्षांच्या गटाचा भाग असूनही आपने काँग्रेससोबत युती नाकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. या महिन्याच्या सुरुवातीला, केजरीवाल यांनी सांगितले की त्यांचा पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कोणतीही युती करणार नाही. २०१५ पासून दिल्लीत आप सत्तेत आहे. त्याचवेळी दिल्लीत पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस उत्सुक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी यापूर्वी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये करार झाला होता. पण हा करार दोन्ही पक्षांनी जसा विचार केला होता तसा चालला नाही.
दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी त्यांचा पक्ष सर्व जागांवर एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. लोकसभा निवडणुकीत झालेल्या कराराला त्यांनी चूक म्हटले होते. आपला पक्ष पुन्हा चूक करणार नाही, असेही ते म्हणाले होते. तर, आपचे प्रवक्ते म्हणाले होते की त्यांचा पक्ष एकटाच भाजप आणि काँग्रेसला हाताळण्यास सक्षम आहे.
हे ही वाचा :
ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट मोजणीमध्ये तफावत नाहीच
आरोपी बस चालकाला संतप्त नागरिकापासून असे वाचवले पोलिसांनी
सीरियामधून ७५ भारतीयांचे यशस्वी स्थलांतर; लवकरच मायदेशी परतणार
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिल्लीचा मतदार स्वतंत्रपणे मतदान करतानाचे चित्र आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये हाच कल दिसून आला आहे. दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा गेल्या तीन वेळा भाजपाला गेल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे लोकसभेत आपची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. याउलट विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची आतापर्यंतची कामगिरी चांगली राहिली आहे. तर, काँग्रेसने आपल्या अनेक जागा गमावल्या आहेत.