भाजपामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही

भाजपामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला होता. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. नाथाभाऊ आमचे नेते आहेत. त्यांनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं, असा टोला लगावतानाच भाजपामध्ये अस्वस्थता नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा टोला लगावला आहे. नाथाभाऊ आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरं बोलावं. दीड वर्षात त्यांनी एकही आंदोलन केलं नाही. आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकलो, असं सांगतानाच आम्हाला फसवलं गेलं याचं आम्हाला दु:खं आहे. आमच्याशी धोका झाला. पण भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही, असं पाटील म्हणाले.

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनाही टोला लगावला. संजय राऊतांच नाव घेऊन माझा दिवस का बिघडवता? असा सवाल करतानाच राऊतांनी ८० जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी ८० नव्हे २८० जागा लढवाव्यात. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

यावेळी त्यांनी अनलॉकच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर टीका केली. वारंवार टीकेचा स्वभावही नाही अन मुद्दाही नाही. पण ठाकरे सरकारमध्ये कोणत्याही गोष्टीवर एकवाक्यता नाही. प्रत्येकाला प्रेस समोर येण्याची घाई झाली आहे, असं ते म्हणाले.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आंदोलन सुरू केलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. अजित पवार काय किंवा उद्धव ठाकरे काय, त्यांना प्रत्येक गोष्ट केंद्राने करावी असे वाटते. राज्याने आधी १० रुपये टॅक्स कमी करावा, मग केंद्राने ५ रुपये कमी करण्याची मागणी करावी, असा सल्ला त्यांनी आघाडी सरकारला दिला.

हे ही वाचा:

आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार?

सिद्धूना उपमुख्यमंत्रीपदही नाही आणि प्रदेशाध्यक्षपदही नाही

पहाटेच्या शपथविधीनंतर घरी घेतलं नसतं तर काय लायकी राहिली असती?

अल्फा, डेल्टानंतर हा नवा व्हेरियंट, ७ दिवसांत वजन कमी

भाजपामध्ये मतभेद नाहीत आणि असतील तरी ते सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असं सांगतानाच आमच्यामध्ये पक्ष सोडल्यावर मारण्याची पद्धत नाही. जोही पक्ष सोडून जाईल तो आहे तिथे सुखी रहा, अशी आमची पद्धत आहे, असं त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं.

Exit mobile version