मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यावरुन विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देशमुख यांच्या ‘रोखठोक’ टीका केली आहे. संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून लिहिलं आहे की, देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिलं, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.
राऊतांनी म्हटलं आहे की, या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलंय की, अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल? असा सवाल देखील संजय राऊतांनी केला आहे.
हे ही वाचा:
चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार
ठाकरे सरकारच्या अकलेचं दिवाळं निघालाय का?
पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढले ३५००० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण
महाराष्ट्रात जमावबंदीची नियमावली जारी
राऊत यांनी म्हटलं आहे की, “परमबीर सिंह यांनी आरोप केले तेव्हा गृह खात्याचे आणि सरकारचे वाभाडे निघाले, पण महाराष्ट्र सरकारचा बचाव करायला एकही महत्त्वाचा मंत्री तत्काळ पुढे आला नाही. चोवीस तास गोंधळाचेच वातावरण निर्माण झाले. लोकांना परमबीर यांचे आरोप सुरुवातीला खरे वाटले याचे कारण सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची कोणतीही यंत्रणा नाही. एका वसुलीबाज फौजदाराचा बचाव सुरुवातीला विधिमंडळात केला.”