काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथे जाऊन ते भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी करत आहेत पण ते करताना भारताचीही बदनामी करत असल्याची टीका होत आहे. पण यानिमित्ताने इकॉनॉमिक टाइम्समध्ये स्तंभलेखन करणाऱ्या लेखिका सीमा सिरोही यांनी ‘लेटर फ्रॉम वॉशिंग्टन’ या सदरात लिहिताना राहुल गांधींच्या त्या दौऱ्याची पोलखोलही केली आहे.
त्या लिहितात की, राहुल गांधी यांच्या या दौऱ्याला काही मर्यादा आहे. लाक्षणिक अर्थाने आणि शब्दशः हा दौरा एका ठराविक मर्यादेत येतो. त्यांच्याभोवती अल्पसंख्य गटांचे कोंडोळे पाहायला मिळते. विशेष म्हणजे त्यात अनेक काँग्रेस समर्थकच आहेत. ते भारतातल्या काँग्रेसजनांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत का? वॉशिंग्टनमधील त्यांची जी सभा झाली त्याचे आयोजन तर अशा समुहांकडून करण्यात आले होते जे दर आठवड्याला भारतात कसे मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार होत आहेत, याचा पाढा वाचत असतात. कॅपिटल हिल येथे भरपूर खर्च करून त्यांचे कार्यक्रम होत असतात. त्यांचे प्रवक्ते तर मोदीविरोधापासून सुरुवात करतात आणि भारतविरोधी होऊन जातात. अल्पसंख्यांकाच्या अधिकाराबाबत जागरूक असलेले लोकही मग त्यांच्यापासून दूर राहणेच पसंत करतात.
हे ही वाचा:
पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांना कागदी घोड्यांचा फटका
कुस्ती महासंघाच्या निवडणुका ३० जूनपर्यंत; क्रीडामंत्र्यांनी दिले आश्वासन
पुण्यातील ३९ गृहप्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर!!
‘स्टीव्ह स्मिथ आमच्या पिढीतील सर्वोत्तम कसोटी फलंदाज’
सिरोही म्हणतात की, राहुल गांधी यांच्या या प्रकारच्या गोंधळसदृश कार्यक्रमाबद्दल त्यांच्या समर्थकांमध्येही नाराजी आहे. सँटा क्लारा येथे झालेला कार्यक्रम तर गोंधळाचा नमुना होता. या सभेला गर्दी वाढावी म्हणून अखेरच्या क्षणी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि सर्वसामान्यांना तेथे प्रवेश देण्याचा प्रयत्न झाला. ते सभागृह भरल्याचा भास निर्माण करण्यात आला पण प्रत्यक्षात परिस्थिती तशी नव्हती. आता निदान न्यूयॉर्कला होणाऱ्या अखेरच्या सभेला तरी ही परिस्थिती येऊ नये. भाजपाच्या जय्यत तयारीनिशी केलेल्या कार्यक्रमांच्या तुलनेत काँग्रेसचे घाईघाईने केलेले आयोजन दिसते.