“…तर ‘शक्ती’ कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपाचे सर्व सदस्य राजीनामे देतील”

“…तर ‘शक्ती’ कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपाचे सर्व सदस्य राजीनामे देतील”

महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात भारतीय जनता पार्टी आक्रमक होत आहे. महिला संरक्षणासाठी ‘शक्ती’ कायदा तयार केला जात आहे. पण मंत्रीच जर महिलांच्या अत्याचारात सामील असतील तर हा कायदा काय कामाचा? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याशिवाय वनमंत्री संजय राठोड यांनी जर राजीनामा दिला नाही, तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपाचे सर्व सदस्य राजीनामे देतील. असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्रातील सरकारपेक्षा मोगलाई काय वेगळी होती?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली. राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. ते रोखण्यासाठी सरकारने शक्ती कायदा आणला आहे. पण राज्यातील मंत्रीच या अत्याचारात सहभागी आहेत. सत्ता पक्षाच्या लोकांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नव्या कायद्याने दिली आहे का? ही कोणती शक्ती आहे?

“महाराष्ट्रात कधीही झाला नाही असा प्रकार या सरकारमध्ये होत आहे. महाराष्ट्रात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासंदर्भातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. हा प्रकार महाराष्ट्रात पूर्वी कधीही झालेला नाही. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये संजय राठोड राजीनामा देत नाहीत यामध्ये संजय राठोड यांना मी दोष देणार नाही, त्यांच्यावर वरिष्ठांचा हात आहे. वरिष्ठांच्या आशिर्वादामुळेच मंत्री राजीनामा देत नाहीत.” असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

हे ही वाचा:

“बेकायदेशीरपणे बजेट अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रस्ताव” – देवेंद्र फडणवीस

सत्तेसाठी शिवसेना किती लाचार होणार आहे?

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारे अभिवादन करणारे विधान किंवा ट्विटही करण्यात आलं नाही. काँग्रेस पक्षाने जन्मभर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अन्याय केला. पण शिवसेनेकडून एकही ट्विट आणि विधान येऊ नये ही केवढी लाचारी आहे? सत्तेसाठी शिवसेना किती लाचार होणार आहे? सत्ता येते आणि जाते, पण इतिहासात या लाचारीची नोंद कायम राहील.” अशी टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली.

Exit mobile version