कुस्तीगीरांचे आंदोलन म्हणजे हुडा आणि बजरंग पुनिया यांचा कट

बृजभूषण सिंह यांनी केला आरोप

कुस्तीगीरांचे आंदोलन म्हणजे हुडा आणि बजरंग पुनिया यांचा कट

गेल्या काही दिवसांपासून लैंगिक अत्याचाराच्या आरोपांवरून कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे कैसरगंज येथील खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटू यांनी आंदोलन पुकारले आहे. मात्र, हे आंदोलन काँग्रेस नेते दिपेंदर हुडा आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांच्याकडे ऑडिओ क्लिपही असल्याचा दावा त्यांनी केला.

‘जेव्हा वेळ येईल. तेव्हा ही क्लिप दिल्ली पोलिसांकडे दिली जाईल. त्यावेळी प्रियंका गांधी यांना या आंदोलनामागील सत्य कळेल आणि आपण आंदोलनस्थळी जायला नको होते. हे त्या समजून चुकतील,’ असे ते म्हणाले. बृजभूषण सिंह यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ‘आपल्याला अद्याप एफआयआरची प्रत मिळालेली नाही. परंतु, मी पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करेन,’ असे बृजभूषण सिंह म्हणाले. ‘आंदोलन करणे हा त्यांचा हक्क आहे. परंतु आंदोलनस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या जात असताना रेल्वेशी संबंधित खेळाडू अशा ठिकाणी आंदोलन कसे काय करू शकतो,’ असा प्रश्न बृजभूषण सिंह यांनी उपस्थित केला आहे.

‘माझा राजीनामा हा हेतू नाही’

बृजभूषण सिंह यांनी माझा राजीनामा हा आंदोलकांचा खरा हेतू नसल्याचा दावा केला. फोगट कुटुंबीयांना कुस्ती महासंघावर वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे, असे ते म्हणाले. मात्र कुस्तीपटू संहिता फोगट हिच्याशी विवाह करणाऱ्या बजरंग पुनिया यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. ‘त्यांचा मुलगा उत्तर प्रदेश संघाचा अध्यक्ष आणि त्यांचा मुलाचा मेहुणा सचिव आहे. त्यांचा जावई राज्याच्या असोसिएशनचा सदस्य आहे. ते आमच्यावर परिवारवादाचा आरोप करत आहेत आणि तेच स्वत: तो चालवत आहेत,’ असे बजरंग पुनिया म्हणाले.

आंदोलनाचा नववा दिवस

या आंदोलनाचा सोमवारी नववा दिवस होता. बृजभूषणसिंहला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कुस्तीपटूंनी केला आहे. जानेवारीमध्येदेखील कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते. मात्र यावेळी त्यांनी गेल्या वेळेप्रमाणे कोणत्याही राजकीय पक्षांना आंदोलनस्थळी येण्यापासून रोखले नाही. त्यामुळे आतापर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आम आदमी पक्षाच्या मंत्री आतिषी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आंदोलनकर्त्यांना भेट दिली आहे. तर. पप्पू यादव आणि सत्यपाल मलिक यांनीही आंदोलनस्थळी भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे ही वाचा:

मद्यपी पोलिसांना हिमंता बिस्वसर्मांनी कायमचे घरी पाठवले

उत्तर प्रदेशच्या राम सिंह यांनी केला चक्क रेडिओंचा संग्रह!

नेपाळवरून येऊन ‘ते’ करतात रत्नागिरीतील हापूस आंब्याची राखण !

‘बारसूत रिफायनरीच्या जागेवर शेती नाही, घरे नाहीत, लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न नाही’

हत्येची कबुली देणारा व्हिडीओ व्हायरल

एका जुन्या मुलाखतीत बृजभूषण हे हत्येची कबुली देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ दाखवून पुनिया यांनी बृजभूषणच्या अटकेची मागणी केली. तसेच, प्रसारमाध्यमे खेळाडूंपेक्षा खासदाराला पाठिंबा का देत आहेत, असा प्रश्नही उपस्थित केला. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघा. येथे बसलेले खेळाडू किंवा अन्य खेळाडूंची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का?, असाही सवाल त्यांनी केला.

Exit mobile version