‘सुरक्षित आणि मजबूत भारतनिर्माणाचे कार्य सुरूच राहील’

दुसऱ्यांदा गृहमंत्री झालेले अमित शहा यांचा निर्धार

‘सुरक्षित आणि मजबूत भारतनिर्माणाचे कार्य सुरूच राहील’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन सरकारच्या मंत्र्यांना सोमवारी खातेवाटप करण्यात आले. अमित शहा यांना दुसऱ्यांदा गृहमंत्री बनवण्यात आले आहे. ते गृहमंत्रालयासह सहकार मंत्रालयाचा कारभारही सांभाळतील. दुसऱ्यांदा गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिल्याबद्दल अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ‘सुरक्षित आणि मजबूत भारनिर्माणाचे काम सुरूच राहील,’ अशी ग्वाही शहा यांनी यावेळी दिली.

‘माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि मला गृहमंत्री व सहकार मंत्रिपदाची जबाबदारी दुसऱ्यांदा सोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. मोदी ३.०मध्ये गृहमंत्रालयाकडून सुरक्षेसंदर्भातील बाबी वेगवान आणि मजबूत करणे सुरूच ठेवेल. पंतप्रधान मोदी यांचा सुरक्षित भारताचा दृष्टिकोन पूर्ण करण्यासाठी नवा आयाम सादर करेल. तसेच, पंतप्रधान मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली सहकार मंत्रालय ‘सहकार ते समृद्धी’ या दृष्टिकोनातून शेतकरी आणि गावांना सशक्त बनण्यासाठी कटिबद्ध राहील,’ अशी प्रतिक्रिया शहा यांनी ‘एक्स’वर दिली आहे.

मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात राजनाथ सिंह यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. तर, दुसऱ्या कार्यकाळात अमित शहा गृहमंत्री बनले होते. शहा त्यांच्या वेगळ्याच शैलीने काम करण्यासाठी ओळखले जातात. ते गृहमंत्री असताना जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आले होते. तसेच, नागरिकता दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्यात आला होता.

हे ही वाचा:

रेल्वे पोलीस विभागाला ४०० टक्क्याचे अमिष दाखवून निविदा केली मंजूर

बेटकुळ्या दाखवणाऱ्यांना महायुतीचे नेते वेसण घालतील काय?

मुंबई विमानतळावर १९ कोटींचे सोने जप्त; दोन परदेशी महिलांना अटक

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा

जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हादेखील अमित शहा गृहमंत्री होते. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांनी गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून मोठ्या संख्येने विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार सोनल पटेल यांचा सुमारे साडेसात लाख मतांनी पराभव केला. २०१९च्या निवडणुकीत अमित शहा यांनी काँग्रेसच्या चतुरसिंह चावडा यांचा साडेपाच लाख मतांनी पराभव केला होता.

Exit mobile version