संदेशखालीतील महिला म्हणजे ‘शक्तीस्वरूप’

पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या उमेदवाराशी फोनवरून साधला संवाद

संदेशखालीतील महिला म्हणजे ‘शक्तीस्वरूप’

संदेशखालीतील रहिवासी असणाऱ्या रेखा पत्रा या तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शाहजहान शेख याच्या विरोधातील महिला आंदोलनाच्या चेहरा होत्या. त्या आता बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रेखा यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

रेखा पत्रा या शाहजहान शेख याच्या विरोधातील महिला आंदोलनाचा चेहरा होत्या. सध्या हा नेता तुरुंगाची हवा खात असून त्याच्यावर बेकायदा जमीन बळकावणे आणि लैंगिक हिंसाचाराचे आरोप आहेत. पंतप्रधान मोदी यांनी रेखा पत्रा यांच्याशी संवाद साधून आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमेबद्दल जाणून घेतले आणि तिला ‘शक्ती स्वरूप’ असे संबोधून तिचे कौतुक केले. या संवादाची ऑडिओ क्लिप जाहीर करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी पत्रा यांना विचारतात, ‘तुम्हाला आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे? तुम्हाला कसे वाटते आहे?’ त्यावर त्या म्हणतात, ‘मला खूप चांगले वाटते आहे. तुमचे आशीर्वाद माझ्या आणि संदेशखालीतील तमाम महिलांच्या डोक्यावर आहेत. जणू आम्हाला प्रभू रामाचाच आशीर्वाद मिळाला आहे,’ अशा भावना पात्रा यांनी व्यक्त केल्या.

त्यानंतर पात्रा यांनी संदेशखालीतील महिलांना ज्या नरकयातनेतून जावे लागले, त्याचा पाढा वाचला. ‘आमच्यासोबत खूप दुःखदायक घटना घडल्या. केवळ संदेशखालीतीलच नव्हे तर संपूर्ण बशीरहाट भागातील महिला यात होरपळल्या. आम्हाला आरोपीवर कठोर कारवाई हवी आहे. आम्हाला सन २०११ पासून मतदानही करता आलेले नाही आणि आम्हाला आशा आहे की आम्ही यंदा मत करू असे,’ असे त्या म्हणाल्या.

पंतप्रधान मोदी यांनी पात्रा यांच्या या धाडसाचे कौतुक केले. ‘रेखाजी, तुम्ही संदेशखालीत मोठ्या संघर्षाला तोंड दिले. त्या दृष्टीने पाहायचे तर, तुम्ही शक्ती स्वरूप आहात. तुम्ही मोठ्या ताकदवान लोकांना तुरुंगात धाडले आहे. तुम्ही नक्कीच ही निवडणूक जिंकाल. तुम्हाला कल्पना आहे का, तुम्ही किती धाडसी आहात ते?’, अशा शब्दांत मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. भारतीय निवडणूक आयोग तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल आणि सुरक्षाव्यवस्थाही योग्य असेल, त्यामुळे तुम्ही निर्भिडपणे मत देऊ शकाल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

हे ही वाचा:

चेन्नईकडून गुजरातचा पराभव

वॉशिंग मशिनमध्ये नोटांची थप्पी; ईडीने छाप्यात जप्त केले २.५४ कोटी रुपये

‘बिग बॉस’ फेम मुनव्वर फारुकीवर गुन्हा दाखल

अमेरिकेत जहाज धडकून ब्रिज कोसळला

पंतप्रधानांशी संवाद साधल्यानंतर रेखा पत्रा यांनी पंतप्रधान संदेशखालीत प्रचाराला आल्यास खूप आनंद होईल, अशी प्रतिक्रिया दिली. ‘माझे पंतप्रधानांशी बोलणे झाले. ते माझ्या आणि संदेशखालीतील तमाम महिलांसोबत आहेत, असे त्यांनी सांगितले. मला खूप अभिमान वाटतो आहे,’ असे रेखा म्हणाल्या. संदेशखालीतील महिलांच्या तक्रारींबाबत शंका उपस्थित होत असल्याबाबत त्यांना विचारले असता त्या संतापल्या. ‘संदेशखालीतील घटनांमध्ये तथ्य नसल्याचे ज्यांना वाटते, त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्हाला लवकरच तुमची चूक कळेल,’ असे त्या म्हणाल्या.

Exit mobile version