चीनधार्जिणे मोइझ्झू यांच्या पक्षाचा विजय

चीनधार्जिणे मोइझ्झू यांच्या पक्षाचा विजय

रविवारी झालेल्या निवडणुकीत चीनधार्जिणे मानले जाणारे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइझ्झू यांच्या पक्षाने निर्विवाद विजय मिळवला आहे. त्यामुळे मालदीवच्या मतदारांनी त्यांच्या चीनविषयक धोरणाला पाठिंबा आणि भारतापासून दूर राहण्याच्या मतांना पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.

मोइझ्झू यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाने निकाल जाहीर झालेल्या ८६ जागांपैकी ६६ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे ९३ जागांच्या ‘पीपल्स मजलिस’ (मालदीवची संसद) निवडणुकीत त्यांना बहुमत मिळाले आहे. मालदीवमधील प्रमुख विरोधी पक्ष मालदिवियन डेमोक्रेटिक पक्ष (एमडीपी) यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांना अवघ्या १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

अलीकडेच मोइझ्झू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी केली होती. मात्र मजलिसमध्ये मिळालेल्या या प्रचंड बहुमतामुळे आता त्यांच्यावरील महाभियोगाची ही टांगती तलवार दूर झाल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा:

चकमकीत मारल्या गेलेल्या माओवाद्यांचा मोठ्या हल्ल्याचा कट होता

मुलीची हत्या झालेल्या काँग्रेस नगरसेवकाची नड्डा यांनी घेतली भेट

बुरखा घालणं, कपाळावर कुंकु न लावणं याबाबतीत दबाव टाकून कर्नाटकात धर्मांतराचा प्रयत्न

यापुढे मी शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही!

मोइझ्झू यांनी अध्यक्ष झाल्यानंतर मालदीवमधील सर्व भारतीय सैनिकांची पाठवणी करण्याची घोषणा केली असून तशी कारवाईही सुरू झाली आहे. त्यांनी अध्यक्ष झाल्यानंतर चीनला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली होती. मालदीव आणि चीनमध्ये संरक्षणासह अनेक मुद्द्यांवर अलीकडेच करारही करण्यात आले आहेत. वादग्रस्त मिळवलेल्या जागेवर हजारो इमारती बांधून चीनशी आर्थिक सहकार्य अधिक सुदृढ करण्याच्या मोइझ्झू यांच्या प्रयत्नांसाठी या मतदानाकडे महत्त्वपूर्ण चाचणी म्हणून पाहिले जात आहे.

Exit mobile version