देशांतर्गत राजकीय फायद्यासाठी ट्रूडो सरकार खालिस्तानी दहशतवाद्यांना संरक्षण देतंय

कॅनडाहून परतलेले भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी केला खुलासा

देशांतर्गत राजकीय फायद्यासाठी ट्रूडो सरकार खालिस्तानी दहशतवाद्यांना संरक्षण देतंय

भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध जबरदस्त ताणले गेले असून सध्या तणावाचे वातावरण आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने काही महिन्यांपूर्वी केला होता. मात्र, भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले होते. कॅनडानेही याबाबतीत कोणतेही पुरावे अद्याप दिलेले नाहीत शिवाय काही दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्याकडे भारताविरोधात ठोस पुरावे नसल्याची कबुली दिली होती. दरम्यान, कॅनडाहून परतलेले भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना पंतप्रधान ट्रुडो आणि त्यांच्या सरकारबद्दल अनेक खुलासे केलेले आहेत.

कॅनडाने केलेल्या तथ्यहीन आरोपांमुळे भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध कसे ताणले गेले आहेत यावर संजय कुमार वर्मा यांनी भाष्य केले आहे. संजय कुमार वर्मा यांनी ठामपणे सांगितले की, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येत भारताचा कोणताही सहभाग नाही. तेथील पोलिसांना माझी चौकशी करायची होती पण त्यांच्याकडे माझ्याविरुद्ध कोणतेही पुरावे यासाठी नव्हते. पुराव्यांची मागणी केली असता त्यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. पोलिसांनी पुरावे दाखवले असते तर चौकशीत नक्कीच सहभाग घेतला असता. पण, त्यांच्याकडे तसे काही नव्हते, असा खुलासा संजय कुमार वर्मा यांनी केला.

खालिस्तानी सुरुवातीपासूनच भारताच्या विरोधात आहे. अशा परिस्थितीत कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. ते खालिस्तानी यांच्यासोबत आहेत आणि भारताविरोधातही आहेत, असे मी म्हणेन. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत त्यांचे मनोबल वाढतच राहणार आहे, असे संजय कुमार वर्मा म्हणाले.

कॅनडाकडून या भूमिकेची अपेक्षा नाही. पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात सुरुवातीपासूनच फरक आहे. पाकिस्तान सुरुवातीपासून एक प्रतिमा घेऊन चालत आला आहे पण कॅनडा तसा नव्हता. त्यामुळेच कॅनडाकडून अशा अपेक्षा नव्हत्या. पण सरकारने जे काही केले ते त्याच्या प्रतिमेच्या विरुद्ध आहे, कॅनडात खलिस्तानी दहशतवादी आहेत. मी खलिस्तानींना शीख मानत नाही. आमचे इतर शीख बांधव खलिस्तानचे समर्थन करणारे नाहीत. जोपर्यंत राजकीय लाभाचा प्रश्न आहे. ट्रुडोचा पक्ष आणि त्यांचे मंत्रीमंडळ या खलिस्तानींचा फायदा घेतात, असं मत संजय कुमार वर्मा यांनी मांडले आहे.

हे ही वाचा : 

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर १० लाखांचे बक्षीस!

भारत- चीनमध्ये झालेल्या करारानंतर दोन्ही बाजूंकडील सैन्य माघारी घेण्यास सुरुवात

झिशान सिद्दिकींनी काँग्रेसची साथ सोडली; वांद्रे पूर्वला वरूण सरदेसाईंविरुद्ध झुंज

जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला

संजय कुमार वर्मा पुढे म्हणाले की, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी (RCMP) कधीही कोणाचे नाव दिले नाही. पण, कॅनडामधील भारतीय मुत्सद्दी आणि त्यांचे अधिकारी माहिती गोळा करण्यासाठी त्यांच्या पदाचा गैरवापर करतात, असे त्यांनी म्हटले. पण, मला म्हणायचे आहे की, आम्ही तिथे माहिती गोळा करत होतो कारण खलिस्तानी हे आपले शत्रू आहेत आणि भविष्यातही आम्ही हे करत राहू, शिवाय हे काम करत असताना आम्ही कुठलेही नियम मोडलेले नाही.

Exit mobile version