राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सरकारमध्ये प्रवेश केला. राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूनी एकत्र यावे अशा आशयाचे पोस्टर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आले होते. त्यानंतर गुरुवार, ६ जुलै रोजी ‘टीव्ही- ९ मराठी’ने सूत्रांच्या हवाल्याने ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर राज्याचे राजकीय गणित पुन्हा बदलणार का? असे प्रश्न उपस्थित झाले.
मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली. राज ठाकरे यांचे निकटवर्ती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांनी भांडूप ते दादर असा एकत्र प्रवास केला. तसेच दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन अभिजीत पानसे यांनी राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे. मात्र. यावर स्वतः अभिजित पानसे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
अभिजीत पानसे म्हणाले, “प्रस्ताव नेण्याएवढा मी मनसे पक्षात मोठ्या स्थानावर नाही. मी राज ठाकरेंचा कट्टर सैनिक आहे. त्यामुळे तशी वेळ येणार असेल तर मला माहिती नाही. युतीवर चर्चा करायची असेल, तर स्वतः राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यावर बोलतील.”
हे ही वाचा:
महायुतीचे सरकार ठाकरे, पवार कुटुंबिय विरहित सरकार
सुप्रिया सुळेंचे भाषण म्हणजे निबंध
‘परसातील साप फुत्कारू लागले आहेत’
वैयक्तिक कामासाठी संजय राऊतांना भेटण्यासाठी सामनाच्या कार्यालयात आल्याचे आणि त्याचे वेगळे अर्थ लावू नका, असं अभिजित पानसे यांनी स्पष्ट केलं. संजय राऊतांशी फार जुने संबंध असून संजय राऊतांना बऱ्याच दिवसांपासून भेटलो नव्हतो त्यामुळे भेट घेतली अशी प्रतिक्रिया पानसे यांनी दिली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला असला तरी ही युतीची पुडी माध्यमांमध्ये कुणी सोडली? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
२७ नोव्हेंबर २००५ रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर गेल्या १८ वर्षांत दोघांनी एकमेकांविरोधात तीव्र टीका केली. त्यानंतर राज ठाकरेंनी सध्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. “जे झालंय ते अत्यंत किळसवाणं आहे. जर तुम्ही जनमताचा कानोसा घेतला तर प्रत्येक घरात तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील. दुसरं तुम्हाला काहीही ऐकायला मिळणार नाही. हा मतदारांचा घोर अपमान आहे. यावर मी भाषणात अनेकदा बोललो आहे. या सर्व गोष्टींवर सविस्तर मेळावे घेणार आहे.”