राज्यसभेच्या ६८ खासदारांचा सन २०२४ मध्ये कार्यकाळ संपणार

भाजपच्या ६० खासदारांमध्ये वैष्णव आणि यादव यांचा समावेश

राज्यसभेच्या ६८ खासदारांचा सन २०२४ मध्ये कार्यकाळ संपणार

नऊ केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या राज्यसभेतील ६० खासदारांचा कार्यकाळ सन २०२४मध्ये संपणार आहे. त्यातील अनेक जण या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव, आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ येत्या एप्रिलमध्ये संपुष्टात येत आहे.

उत्तर प्रदेशच्या वाट्याच्या सर्वाधिक १० जागा रिक्त होत आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्र, बिहार (प्रत्येकी सहा), मध्य प्रदेश, प. बंगाल (प्रत्येकी पाच), कर्नाटक, गुजरात (प्रत्येकी चार), ओडिशा, तेलंगण, केरळ, आंध्र प्रदेश (प्रत्येकी तीन), झारखंड आणि राजस्थान (प्रत्येकी दोन) आणि उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरयाणा आणि छत्तीसगड (प्रत्येकी एक)मध्ये राज्यसभेच्या जागा रिक्त होत आहेत. तर, चार नामनियुक्त खासदारांचा कार्यकाळ जुलैमध्ये संपुष्टात येत आहे.

या नामनिर्देशित खासदारांमध्ये भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे हिमाचल प्रदेशातून अर्ज दाखल करू शकतात. त्यांचे मूळ राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने ते अन्य राज्यांतून अर्ज दाखल करू शकतात. तर, कर्नाटक आणि तेलंगणमध्ये सत्ता आल्याने या दोन्ही राज्यांतून काँग्रेस पक्ष आपले प्रतिनिधी राज्यसभेत पाठवेल.

हे ही वाचा:

मुंबई आयआयटी; मुलांना कोटीकोटी

चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आता मोदींचे मीरा मांझींना पत्र!

२५० रुपये मोजा आणि शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून प्रवास करा!

न्यायनिवाडा करताना नेवाडात आरोपीची न्यायाधीशांवर उडी!

बिजू जनता दलाचे प्रशांत नंदा आणि अमर पटनाईक (ओडिशा), भाजपचे प्रमुख प्रवक्ते अनिल बालुनी (उत्तराखंड), मत्स्यखात्याचे राज्यमंत्री परषोत्तम रुपाला, काँग्रेसचे नारणभाई राठवा आणि गुजरातचे आमी याज्ञिक यांचाही कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. तर, परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई या महाराष्ट्रातील खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.

Exit mobile version