लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांना एकजूट करण्याची तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात पाटण्यामध्ये २३ जूनला एक बैठक होत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपनेही राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी आपल्या माजी सहकारी पक्षांशी चर्चा सुरू केली आहे.
भाजपच्या नेतृत्वाने कर्नाटकमध्ये जनता दल (सेक्युलर), आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तेलुगु देसम पक्ष (टीडीपी) आणि पंजामध्ये शिरोमणी अकाली दल यांच्याशी आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. शिवाय, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकसोबत आघाडी केली जाणार आहे. तसेच, लवकरच उत्तर प्रदेश, बिहारसहित अन्य राज्यांमधील छोट्या पक्षांशीदेखील आघाडीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे.
पंतप्रधान मोदींनीही दिले संकेत
दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांतील स्थानिक पक्षांशी संबध वाढवून त्यांना रालोआमध्ये सहभागी करून घेण्याचे आवाहन केले होते.
पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पाऊल?
काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या जालंधरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला १५.२ टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ३४.१ टक्के मते मिळवण्याची कामगिरी केली. तर, शिरोमणी अकाली दलाला १७.९ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे शिरोमणी अकाली दलाशी पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने भाजपने पावले उचलली आहेत.
जनता दल (सेक्युलर)शीही चर्चा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि जनता दल (सं) यांच्या आघाडीची चर्चा सुरू झाली होती. मात्र पक्षप्रमुख व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी वोक्कालिगा आणि मुस्लिम मतांवर परिणाम होऊ नये, यासाठी ही चर्चा पुढे सरकू दिली नाही. मात्र, बालासोर रेल्वे अपघातानंतरची परिस्थिती योग्यप्रकारे हाताळल्याबद्दल देवेगौडा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रशंसा केली होती. त्यानंतर जेडीएसच्या अन्य नेत्यांनीही रेल्वेमंत्र्यांचे कौतुक केले होते. त्यामुळे भाजप आणि जेडीएसच्या युतीचे संकेत मिळत आहेत.
हे ही वाचा:
मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये का शिजवले? आरोपी मनोजने सांगितले कारण
अमेरिकेतील सभांमध्ये राहुल गांधींच्याभोवती जिहादीं गटांचे कोंडाळे
पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांना कागदी घोड्यांचा फटका
कुस्ती महासंघाच्या निवडणुका ३० जूनपर्यंत; क्रीडामंत्र्यांनी दिले आश्वासन
चंद्राबाबू यांच्यासोबतही बैठक
कर्नाटकमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपने तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याशी संबध वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चंद्राबाबू आणि अमित शाह यांच्यात याबाबत चर्चाही झाली आहे. तसेच, त्यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशीही चर्चा केली आहे. दोन्ही पक्षांनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये एकत्रपणे काम करण्यास सहमती दर्शवल्याचे समजते.
या वर्षाअखेर महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. तिथे भाजपचा थेट सामना काँग्रेसशी होईल. नायडू हे आंध्र प्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआरएसपीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ते भाजपसोबत आघाडी करण्यास उत्सुक आहेत. तर, भाजप तेलंगणामध्येही वेगाने पुढे येत आहे. तिथे आपली पकड मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न राहील.