धनुष्यबाण आणि शिवसेना कोणाची या मुद्द्यावरून राज्यात गेले काही दिवस राजकीय वादळ उठले होते. अखेर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट कोणत्या नावाने आणि चिन्हावर निवडणूक लढवणार याकडे लक्ष असणार आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून तीन चिन्हांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदे गटाकडून आज एक परिपत्रक जारी करुन निवडणूक चिन्हावर आपली भूमिका मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यापूर्वी रविवार, ९ ऑक्टोबर रोजी शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये पक्षाच्या चिन्हाबाबत आणि नावाबाबत पक्षाच्या कार्यकारिणीने निर्णय घ्यावा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
शिंदे गटाकडून तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हांना प्राधान्य देण्यात आलं असल्याची माहिती आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत शिंदे गट या चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल
चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच
उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर
अरुण गोविल काय म्हणाले ‘आदिपुरुष’ बद्दल
दरम्यान, ठाकरे गटाने कालच तीन चिन्हं आणि तीन नावं निवडणूक आयोगाकडे पाठवली आहेत. उद्धव ठाकरेंनी त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या मधील एक चिन्हं आणि (शिवसेना) बाळसाहेब ठाकरे, (शिवसेना) बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि (शिवसेना) उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन नावांपैकी एक नाव देण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे.