प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या चौकशीचा अहवाल संसदेची नैतिकता पालन समिती ४ डिसेंबरला लोकसभेत सादर करणार आहे. त्यामध्ये त्यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
मौईत्रा यांच्या चौकशीचा अहवाल भाजप खासदार विनोद सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील नैतिकता पालन समितीने ९ नोव्हेंबर रोजी स्वीकारला होता आणि लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापुढे सादर केला होता. नैतिकता पालन समितीच्या सहा सदस्यांनी त्यांच्यावरील आरोपाचा हा अहवाल स्वीकारला होता. तर, चार सदस्यांनी विरोध केला होता.
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतली होती, अशी तक्रार भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली होती. त्यानंतर लोकसभाध्यक्षांनी मोईत्रा यांची चौकशी करण्याचे आदेश नैतिकता पालन समितीला दिले होते.
हे ही वाचा:
२०२८मधील सीओपी यजमानपदासाठी भारत उत्सुक
अबब! मोबाईल नाहीतर अख्खा मोबाईल टॉवरच गेला चोरीला!
बेंगळुरूमधील १५ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!
इस्रायलकडून हमासवर पुन्हा हल्ले सुरू!
अदानी ग्रुप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारे प्रश्न संसदेत विचारण्यासाठी मोईत्रा यांनी लाच घेतल्याचा आरोप दुबे यांनी केला होता. त्याबदल्यात हिरानंदानी यांच्याकडून त्यांना महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयातील वकील जय देहादरी यांनी लिहिलेल्या पत्रात मोईत्रा आणि हिरानंदानी यांच्यामध्ये अशा भेटवस्तूंची देवाणघेवाण झाल्याचे नमूद केले होते. त्या आधारे दुबे यांनी हे आरोप केले. तसेच, मोईत्रा यांच्या संसदेतील लॉइन आयडीही हिरानंदानी यांना संसदेत प्रश्न विचारण्यासाठी देण्यात आला होता, असाही आरोप आहे. हा आयडी दुबई, न्यू जर्सी, अमेरिका आणि बेंगळुरूमधून वापरण्यात आला, असेही चौकशीत सिद्ध झाल्याचे समजते. अर्थात मोईत्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.