हा तर देशासाठी ऐतिहासिक क्षण…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ विधेयकाबाबत व्यक्त केल्या भावना

हा तर देशासाठी ऐतिहासिक क्षण…

वक्फ सुधारणा विधेयक हे संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. मागील काही दिवसांपासून वक्फ सुधारणा विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. अखेर हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहात मॅरेथॉन चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं. यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर होताच नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, “वक्फ (सुधारणा) विधेयक आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होणे हा देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे. हे सामाजिक- आर्थिक न्याय, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक वाढीसाठी आमची सामूहिक वचनबद्धता अधोरेखित करते. हे विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल जे दीर्घकाळ दुर्लक्षित आहेत, ज्यांचा आवाज ऐकू येत नव्हता आणि जे संधीपासून वंचित राहिले आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी लिहिले आहे की, संसद आणि समितीच्या चर्चेत सहभागी होऊन आपले विचार व्यक्त करणाऱ्या सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार. या चर्चांनी विधेयकाला आणखी बळ देण्याचे काम केले आहे. या निमित्ताने संसदीय समितीकडे आपल्या बहुमोल सूचना पाठवणाऱ्या असंख्य लोकांचे विशेष आभार. यावरून पुन्हा एकदा दिसून येते की व्यापक चर्चा आणि संवाद किती महत्त्वाचा आहे, असे म्हणून त्यांनी या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक घटकाचे आभार मानले आहेत.

“अनेक दशकांपासून वक्फ व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव होता. त्यामुळे प्रामुख्याने आपल्या मुस्लिम माता- भगिनी, गरीब आणि मुस्लिम बांधवांच्या हिताचे नुकसान होत होते. आता संसदेने मंजूर केलेल्या विधेयकामुळे पारदर्शकता तर वाढेलच शिवाय लोकांच्या हक्कांचे रक्षण होण्यासही मदत होईल,” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, यासह आपण अशा युगात प्रवेश करू जो आजच्या काळाशी सुसंगत असेल आणि सामाजिक न्यायासाठी वचनबद्ध असेल. देशातील प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अधिक मजबूत, सर्वसमावेशक आणि संवेदनशील भारत घडवण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

हे ही वाचा : 

केनियन नागरिक असलेल्या महिलेला अटक, २० कोटींचे कोकेन जप्त

एआय स्वीकारण्यात भारत दक्षिण आशियाचे नेतृत्व करणार

“पूल शॉटचा अंदाज चुकला, कोहलीचा खेळ संपला!

यूपीत माफियागिरी चालणार नाही

लोकसभेच्या पाठोपाठ राज्यसभेत गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजता वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत १२ तासांपेक्षा जास्त चर्चा झाली. या मॅरेथॉन चर्चेनंतर अखेर वक्फ विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या बाजूने १२८ मते पडली, तर या विधेयकाच्या विरोधात ९५ मते पडली आहेत. आता हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवलं जाणार असून त्यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.

ही तर कमाल झाली! नरेंद्र मोदी बँकॉकमध्ये राहुल गांधी भारतात | Mahesh Vichare | Rahul Gandhi |

Exit mobile version