विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

आजपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरूवात झाली. कोविडच्या दुसऱ्या लाटेतून सावरल्यानंतर आणि मोदींच्या मंत्रीमंडळात मोठे बदल झाल्यानंतर हे संसदेचे अधिवेशन आहे. त्यामुळे हे अधिवेशन महत्त्वाचे आहे. मोदींनी अधिवेशनापूर्वी विरोधकांना सरकारची उत्तरेदेखील शांतपणे ऐकून घेण्याची विनंती केली होती, मात्र तरीही संसदेचे अधिवेशन चालू झाल्यानंतर काही काळातच विरोधकांनी गोंधळ घालून प्रथम लोकसभा आणि नंतर राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी बंद पाडले. दोन्ही सभागृहांचे कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

मोदींनी या अधिवेशनापूर्वी प्रथेप्रमाणे माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी सरकार सर्व प्रश्नांना सामोरे जाण्यास तयार आहे. विरोधकांनी अधिकाधीक तिखट प्रश्न विचारावेत मात्र त्याचवेळी सरकारची उत्तरे देखील ऐकून घ्यावीत आणि शांतपणे सदनाचे कामकाज चालू द्यावे असे आवाहन केले होते. मात्र विरोधकांनी या आवाहनाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचे कामकाड सुरू झाल्यानंतरच्या काही वेळातच लक्षात आले.

लोकसभेमध्ये नव्या सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर मोदींचे लहानसे भाषण झाले. नव्या मंत्र्यांचा परिचय करून देणे हे या भाषणाचे उद्दिष्ट होते, मात्र विरोधकांनी प्रचंड गोंधळ केल्यामुळे त्यांनी हा परिचय करून देता आला नाही. ते म्हणाले, “मला वाटलं आज सभागृहात उत्साहाचं वातावरण असेल. मोठ्या संख्येत महिला, दलित, आदिवासी, शेतकरी कुटुंबातील खासदार आता मंत्री झाल्याने आनंदाचं वातावरण असेल. त्यांचा परिचय करुन देणं आनंदाचं होतं, मात्र काहींना दलित, महिला, ओबीसी, शेतकरी पुत्र मंत्री झालेले रुचले नाही. त्यामुळेच त्यांनी परिचय करु दिला नाही.”

यानंतर लोकसभेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राजनाथ सिंह यांनी बोलायचा प्रयत्न केला असता, विरोधकांनी गोंधळ करायला सुरूवात केली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करावे लागले.

दुसरीकडे राज्यसभेचे कामकाजदेखील दोन वाजेपर्यंत स्थगित केले गेले. राज्यसभेत पियुष गोयल यांचे स्वागत करण्यात आले. परंतु त्यानंतर त्या सभागृहाचे कामकाज देखील फारसे होऊ शकले नाही. तिथेही विरोधकांनी दंगा केल्यामुळे, अखेरीस हे सभागृह देखील दोन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.

हे ही वाचा:

आजपासून सुरु होणार संसदेचे अधिवेशन

महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रदीर्घ आयुष्य लाभो

शेर बहादुर देउबांवर नेपाळला ‘विश्वास’

येत्या २४-३६ तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

कोविड काळातील हे अधिवेशन बऱ्याच अंगांनी महत्त्वाचे आहे. या पावसाळी अधिवेशनात २ आर्थिक विधेयकांसह एकूण ३१ विधेयकं मांडली जाणार आहेत. १३ ऑगस्टपर्यंत सभागृहाचं कामकाज नियोजित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे २० जुलैला कोरोनावर निवेदन देणार आहेत. देशातील कोरोनाची सद्यस्थिती, लसीकरण मोहीम, उद्योग धंदे वगैरेवर मोदी सरकारची बाजू मांडतील.

Exit mobile version