ज्येष्ठ आदिवासी नेते व माजी केंद्रीय मंत्री विष्णुदेव साय यांची रविवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या निवडीनंतर ‘मोदींनी दिलेली हमी मी सरकारच्या माध्यमातून पूर्ण करेन,’ असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
रायपूर येथे झालेल्या भाजपच्या नवनिर्वाचित ५४ आमदारांच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर साय यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ‘छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या हमीमुळेच भाजपला विजय प्राप्त झाला आहे. त्यामुळे मोदींनी दिलेली हमी मी सरकारच्या माध्यमातून पूर्ण करेन. राज्यातील १८ लाख कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे देण्यास सरकार प्राधान्य देईल,’ अशी घोषणा साय यांनी केली.
छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘मोदी की गॅरंटी २०२३’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर साय यांनी आमदारांसह राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेतली व त्यांना साय यांच्या निवडीचे पत्र सुपूर्द केले. त्यनंतर राज्यपालांनी साय यांना मुख्यमंत्रिपदी नियुक्तीचे पत्र देण्याची औपचारिकता पूर्ण केली.
भाजपने छत्तीसगडमधील विधानसभा निवडणूक लढताना मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर केला नव्हता. भाजपचे या निवडणुकीत ९० जागांपैकी ५४ आमदार निवडून आले. त्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांनी ३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल बघेल यांनी साय यांचे अभिनंदन केले.
हे ही वाचा:
साडेतीनशे कोटींचं घबाड सापडण्यापूर्वी काँग्रेस खासदार साहू काळ्या पैशाने होते व्यथित
महाराष्ट्रात ISIS विरोधात NIA ची कारवाई, साकीब नाचनला अटक
अमेरिकेत भारतवंशी जाणून घेणार राम मंदिराचा संघर्ष
गाझामध्ये युद्धबंदीची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाविरोधात अमेरिकेकडून नकाराधिकार
साय यांचा प्रवास
कुंकुरी विधानसभा जागेवरून लढताना विष्णुदेव साय यांना ८७ हजार ६०४ मते मिळाली. आदिवासी चेहरा असल्याने साय हेच भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार होते. मोदी यांच्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी स्टील मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून कारभार बघितला होता. तसेच, ते १६व्या लोकसभेत रायपूरचे खासदारही होते. त्यांनी सन २०२० ते २०२२ या काळात छत्तीसगडचे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती.