विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार यांच्या बाजून निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाची दारं ठोठावली होती. यावर सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला महत्वाचे निर्देश देताना निवडणुकीपर्यंत त्यांना दिलेलं नाव कायम ठेवा असं म्हटलं आहे. तसेच नव्या चिन्हाबाबत निश्चित कालावधीत निकाल द्यावा असे निर्देशही दिले आहेत.
अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे त्यांचं चिन्ह असल्याचा निकाल नुकताच निवडणूक आयोगानं दिला होता. या निकालाविरोधात शरद पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस काढली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, “७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला जे नाव दिलं ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ ते निवडणूक होईपर्यंत कायम ठेवावं. तसेच शरद पवार हे नव्या निवडणूक चिन्हासाठी पुन्हा निवडणूक आयोगात जाऊ शकतात. शरद पवार गटानं अर्ज केल्यानंतर आठवड्याभरात निवडणूक आयोगानं यावर निर्णय द्यावा, असे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिले आहेत.
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, “निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ हे नाव वापरण्याची परवानगी दिली. मराठा विधेयकासाठी विधानसभेत एक दिवसीय अधिवेशन सुरू होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी या महिन्याच्या अखेरीस पॅम्प्लेट इत्यादी छापण्याचे काम सुरू होईल. अंतरिम उपाय म्हणून, तेच नाव पुढे चालू ठेवण्यास अनुमती द्यावी.”
हे ही वाचा:
‘फारुख अब्दुल्ला मोदींना भेटत असत!’
६०० गायींची कत्तल, होम डिलिव्हरी, अलवरच्या बीफ मार्केट मधील खुलासा!
अफगाणिस्तानात जिवंत लोकांचे फोटो काढण्यास मनाई
नॅशनल कॉन्फरन्सनंतर पीडीपीही ‘इंडिया’तून बाहेर
दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगानं खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता आणि चिन्ह कोणाचं? यावर निकाल दिला होता. त्यानुसार अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही बहाल करण्यात आलं. यानंतर १५ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या निकालानुसार, पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल देताना ते अजित पवार गटालाच दिलं.