पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ‘इंडी’ आघाडीच्या पराभवाला आणि सलग तिसऱ्यांदा केंद्रात भाजप सत्तेत आल्याबद्दल काँग्रेसला दोष दिला आहे. ममता यांनी लिहिलेल्या तीन नव्या पुस्तकांचे कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्याच्या पहिल्या दिवशी प्रकाशन करण्यात आले. ‘बांगला निर्बाचों ओ आमरा’ (बंगाल निवडणुका आणि आम्ही) या त्यांच्या एका पुस्तकात त्यांनी लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण केले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्रात तिसऱ्यांदा भाजपा सत्तेवर येण्यासाठी त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. ममता यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या चुकांमुळे, विरोधी ‘इंडी’ आघाडीला निवडणुकीत यश मिळू शकले नाही आणि भाजपला सत्तेत परतण्याची संधी मिळाली. त्यांनी लिहिलेल्या निरीक्षणानुसार, तृणमूल काँग्रेसने मनापासून प्रयत्न करूनही, काँग्रेसच्या अपयशामुळे ‘इंडी’ गटाला निवडणुकीत यश मिळू शकले नाही.
“आम्हाला सर्व भाजपविरोधी शक्ती एकत्र करून राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत विरोधी गट हवा होता. सुरुवातीपासूनच, आम्ही समान किमान कार्यक्रम आणि समान घोषणापत्राचा आग्रह धरला होता. विरोधी गटाच्या नावाचाही माझा प्रस्ताव होता. काँग्रेसला राष्ट्रीय गटाच्या नेत्याची खुर्ची ऑफर करण्यात आली. पण असे असूनही, एक समान किमान कार्यक्रम किंवा कोणताही समान जाहीरनामा नव्हता. गटातील घटक पक्ष आपापसात लढले. त्यामुळे बहुमत न मिळवताही भाजपला पुन्हा सत्ता मिळवण्यात मदत झाली,” अशी तिखट टीका ममता यांनी आपल्या पुस्तकात केली आहे.
हे ही वाचा :
बांगलादेशात १६ वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण, पोलिसांकडून दुर्लक्ष!
सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीसाठी ट्रम्प यांनी स्पेसएक्सकडे मागितली मदत
मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातून सहा रॉकेट्स जप्त
महाकुंभ: मौनी अमावस्येला भाविकांचा महापूर, ४ कोटी भक्तांचे स्नान!
ममत बॅनर्जी यांनी पुस्तकात असाही दावा केला आहे की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जितक्या जागा जिंकल्या आहेत, त्या प्रामुख्याने इंडी आघाडीच्या इतर मित्रपक्षांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाल्या आहेत. तसेच त्यांनी प. बंगालमधील काँग्रेस आणि सीपीआय (एम) यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीमधील जागावाटप मुद्द्यावरही भाष्य केले. त्या म्हणाले की, भाजपसोबतच्या गुप्त करारांतर्गत ही राज्यातील तृणमूल काँग्रेसविरोधी आघाडी आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे यश हे त्यांच्या सरकारने हाती घेतलेल्या विविध विकास कामांना मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्यामुळे होते.