मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन त्यांचे उपोषण सोडलं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू होतं. यानंतर मराठा आरक्षणविषयक विजयी सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांनी आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्या कार्याचे कौतुक केले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण केल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय मध्यरात्री घेण्यात आला. त्याविषयाचा अध्यादेश काढण्यात आला. त्याची राजपत्रात नोंद करण्यात आली. ‘हा तुमच्या विजयाचा दिवस’ असल्याचे ते म्हणाले. आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मराठा समाजाने शांततेने मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केलं त्याबद्दल आभार मानले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांच मी अभिनंदन करतो. मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगतो की, सगळ्या जगाचं लक्ष या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडं लागलं होतं. आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय शिस्तीनं हे आंदोलन आपण मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली केलं. कुठंही या आंदोलनाला गालबोट न लावता हे आंदोलन आपण यशस्वी केलं याबद्दल मी इतर तुमचे अभिनंदन करतो.”
“मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मलाही गोरगरीब मराठ्याची कल्पना आहे. मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती तो शब्द मी पूर्ण केला आहे. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. आनंद दिघे यांची जयंती आहे, बाळासाहेबांची जयंती २३ तारखेला झाली. या दोन्ही गुरुवर्यांचे आशीर्वाद आणि मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील आमच्या पाठीशी आहेत. जमलेल्या मराठा बांधव-भगिनींचं स्वागत करतो,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हे ही वाचा:
दिल्लीच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मुलाची हत्या करून तलावात फेकले
१६ व्या वर्षी पुस्तक लिहिले; ३० मिनिटांतच संपली पहिली आवृत्ती
सरकारकडून जीआर मिळताच जरांगेंकडून आंदोलन मागे
नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार पण आता भाजपासोबत?
सरकार या आरक्षणाबाबत गंभीर असल्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला. जो अध्यादेश काढला, त्याची जबाबदारी सरकारने घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. कायद्याच्या चौकटीतील आरक्षण, टिकणारं आरक्षण देणार असल्याची ग्वाही त्यांनी मराठा आंदोलकांना दिली. मराठा समाजाला सगेसोयऱ्यांसह आरक्षण देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले.