युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धामध्ये अनेक भारतीय नागरिक अजूनही युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठीचा संपूर्ण खर्च भारत सरकार उचलणार आहे. तसेच युक्रेनच्या शेजारील देशांना जोडणारे रस्ते मार्गासोबतच केंद्र सरकार हवाई मार्ग देखील वापरणार आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या १८ हजारांहून अधिक भारतीयांच्या सुरक्षित परतण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. युक्रेनची राजधानी कीव येथील भारतीय दूतावासानेही भारतीय विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. काल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या चर्चेत नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांच्या आणि विशेषतः तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला होता. यावर पुतीन यांनी सकारात्मकता दाखवली होती. त्यानंतर भारतीय विमानांना आसपासच्या देशांसाठी हवाई हद्द खुली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे ही वाचा:
अडकलेल्या विद्यार्थ्यांना सूचना गाड्यांवर तिरंगा लावा
‘या’ बातमीमुळे अदानी पॉवरचे शेअर्स झपाट्याने वाढले…
चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार आनंद सुब्रमण्यम यांना अटक
‘या’ बातमीमुळे अदानी पॉवरचे शेअर्स झपाट्याने वाढले…
वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे दोन उड्डाणे करण्याची योजना आखत आहे. रस्ता मार्गाने भारतीय सरकारी अधिकारी भारतीय नागरिकांना युक्रेन आणि रोमानियाच्या सीमेवरून बुखारेस्टला घेऊन जातील. तेथून एअर इंडियाच्या विमानाने त्यांना भारतात परत आणले जाईल. या विमान प्रवासाचा खर्चही सरकार करणार आहे. यापूर्वी, भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना हंगेरी, पोलंड, स्लोव्हाकिया आणि रोमानियामार्गे दिल्लीत आणण्याची योजना आखली होती. यासाठी युक्रेनला लागून असलेल्या या देशांच्या सीमेवर विशेष भारतीय प्रतिनिधी तैनात करण्यात आले आहेत.