ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवार, १० जुलै रोजी नागपुरात झालेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘कलंक’ शब्दाचा वापर केला. त्यानंतर भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी ट्वीट करत उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं म्हणजे मला या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे की, आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरित परिणाम झाला आहे असं दिसत आहे. त्यामुळे त्यांना मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशा मानसिकतेतून एखादी व्यक्ती बोलत असेल तर मला वाटतं की त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. कारण त्यांची मानसिक स्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. त्यांच्या मानसिक स्थितीवर, व्यवहारावर मला दया येते आहे. त्यांनी एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाकडे जायला हवं,” असा खोचक सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
कलंक या शब्दामुळे आरोप- प्रत्यारोप होत असताना उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं. भाषणात कलंक शब्द वापरला त्यात चुकीचं काय बोललो? तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि नंतर त्यांनाच मंत्रिमंडळात घेतलंत. मी वापरलेला कलंक हा शब्द इतका प्रभावी आहे असं वाटलं नव्हतं. मी एक शब्द वापरला तर तुमची तळपायाची आग मस्तकात का गेली? अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
हे ही वाचा:
देशभरात अतिवृष्टीमुळे एका दिवसात ५६ जणांनी गमावला प्राण
कलम- ३७० विरोधातील याचिकांवर २ ऑगस्टपासून सुनावणी
पाकमधून आलेल्या सीमा हैदरने सोडली चिकन बिर्यानी, करू लागली तुळशीची पूजा
जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन टॉपला; दहशतवादी संघटनांमधील भर्तीही झाली कमी
यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत आठ मुद्दे मांडत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. “स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!” असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.