राज्यात पाचव्या टप्प्यात मुंबईतील सर्व सहा जागांवर मतदान झाले होते. यावेळी मतदानाची प्रक्रिया धीम्या गतीने होत असल्याच्या काही तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि निवडणूक आयोगावर टीका केली होती. धीम्या गतीने होत असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेला त्यांनी भाजपाला आणि निवडणूक आयोगाला जबाबदार ठरवले होते. यावरून आता उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंची ही पत्रकार परिषद आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. या पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांबद्दलची तक्रार भाजपाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला त्यादिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने भाषांतर करून पाठवलेला पत्रकार परिषदेचा मसुदा केंद्रीय निवडणूक आयोग परत तपासून पाहणार आहे. पत्रकार परिषदेत काही वादग्रस्त आहे का? आचारसंहिता उल्लंघन झाले आहे का? या सगळ्याची तपासणी करुन निवडणूक आयोग पुढील कारवाई करणार आहे.
हे ही वाचा:
लोकसभा निवडणुकीदरम्यान ११०० कोटी रुपयांची रोकड, दागिने जप्त
एअर इंडियाच्या विमानात आठ तास एसीशिवाय; प्रवासी बेशुद्ध झाले
ब्रिटनमधून सोन्याची घरवापसी; ब्रिटनकडून रिझर्व्ह बँकेने १०० टनांहून अधिक सोनं आणलं
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये वाढ; ३४ आरोपांमध्ये दोषी
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर गंभीर आरोप केले होते. निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहे. आयोगाकडून पक्षपातीपणा करण्यात येत आहे. तसेच मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जात आहे. मतदारांनी रांगा पाहून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. यावर भाजपा नेते आशिष शेलारांनी तक्रार केली होती. ते म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंनी भाजपावर बिनबुडाचे आरोप करत निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत. हे आचारसंहितेचे उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी. तसेच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत खोटी आणी दिशाभूल करणारी विधाने केली आहेत.