न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका स्वीकारून राज्यातील जनभावनेचा आदर राखला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया

न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका स्वीकारून राज्यातील जनभावनेचा आदर राखला

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना मनोज जरांगे यांनी शनिवार, २३ डिसेंबर रोजी बीड येथील सभेत २० जानेवारीला मुंबईत आझाद मैदान, शिवाजी पार्क मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. तसेच आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचे देखील जरांगे पाटील यांनी आपल्या सभेत सांगितले आहे. दुसरीकडे,  दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा समजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार आणि इतरांनी सादर केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालय २४ जानेवारीला क्युरेटिव्ह पिटीशन ऐकणार आहे. न्यायालयाने महाराष्ट्रातील जनभावनेचा आदर राखला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने हा फार मोठा निर्णय आहे. त्यामुळे मी न्यायालयाचे आभार मानतो,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“२४ तारखेला तज्ज्ञ वकिलांची फौज न्यायालयात भूमिका मांडेल. यातून मराठा समाजाला न्याय मिळेल. महाविकास आघाडी सरकारने पुरावे मांडले नव्हते. त्यामुळे अपयश आलं,” असे एकनाथ शिंदे म्हणाले. सर्वांनी संयम राखला पाहिजे. सगळ्यांचे मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षण कसं मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

मराठा समाजाला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा मुहूर्त

कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारला हिजाबचा पुळका; बंदी उठवण्याच्या सूचना

खलिस्तान समर्थकांकडून अमेरिकेतील हिंदू मंदिरावर मोदींविरोधात लिहिला आक्षेपार्ह मजकूर

मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा संपन्न झाली. या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे. २० जानेवारीला आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला. तर, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर इन-चेंबर ही सुनावणी पार पडली होती. दरम्यान, यावेळी राज्य सरकारने सुनावणीत आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे, या प्रकरणावर न्यायालय लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात होती. क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारले जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता न्यायालयाने अखेर क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली आहे.

Exit mobile version