काँग्रेसनेते मणिशंकर अय्यर यांनी १९६२मधील चिनी आक्रमणासाठी ‘कथित’ शब्दांचा वापर करून केलेल्या वक्तव्यावर मंगळवारी रात्री उशिरा नवा राजकीय वाद उद्भवला आहे. भाजपने याला संशोधनवादाचा निर्लज्ज प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. नंतर अय्यर यांनी ‘कथित’ शब्द वापरल्याबद्दल माफी मागितली. तर, काँग्रेसने अय्यर यांच्या वक्तव्यावरून हात झटकले. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी बिनशर्त माफी मागितल्यानंतर प्रकरण मिटले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस नेते अय्यर यांनी मंगळवारी परदेशातील पत्रकारांशी संवाद साधताना क्लबमधील एका कार्यक्रमात एक किस्सा सांगितला. त्यावेळी ऑक्टोबर १९६२ मध्ये चीनने कथितपणे भारतावर आक्रमण केले होते, असा उल्लेख केला. ‘नेहरू फर्स्ट रिक्रूट्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते असे म्हणाले. अय्यर यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. ‘एफसीसीमध्ये नेहरू फर्स्ट रिक्रूट्स नावाच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मणिशंकर अय्यर १९६२च्या चिनी आक्रमणाला कथित म्हणतात. हा संशोधनवादाचा एक निर्लज्ज प्रयत्न आहे,’ अशी टीका मालवीय यांनी केली.
चिनी आक्रमणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
मालवीय यांनी आरोप केला की, नेहरू यांनी चीनच्या बाजूने मत देऊन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळवण्यासाठी भारताचा दावा सोडून दिला होता. राहुल गांधी यांनी गुप्त करारावर स्वाक्षरी केली. राजीव गांधी फाऊंडेशनने चिनी दूतावासाकडून देणगी घेतली आणि चिनी कंपन्यांना भारतात व्यापार करणे सुलभ व्हावे, यासाठी अहवाल सादर केला. त्याआधारे सोनिया गांधी यांच्या यूपीए सरकारने चिनी सामानांसाठी भारतीय बाजाराची दारे उघडली. त्यामुळे देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे नुकसान झाले.
आता काँग्रेसनेते अय्यर १९६२च्या चिनी आक्रमणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यानंतर चीनने ३८ हजार चौरस मीटर भारतीय क्षेत्रावर अवैध कब्जा केला होता. काँग्रेसचे चिनीप्रति प्रेम काय सांगते, असा प्रश्न मालवीय यांनी उपस्थित केला आहे. यावरून वाद झाल्यानंतर काँग्रेस नेते अय्यर बॅकफूटवर गेले. त्यांनी चिनी आक्रमणाच्या आधी ‘कथित’ शब्दाचा वापर चुकून केला गेला, असा दावा करून माफी मागितली.
हे ही वाचा:
हिंदुत्व, ईश्वर समर्थक, माफियाविरोधी प्रतिमेमुळे योगी यांचे स्थान बळकट
नवीन पटनायक यांचा थरथरणारा हात पकडला!
‘आप’चा पाय खोलात; मानहानीच्या खटल्यात आतिशी यांना समन्स
विरारच्या अर्नाळा समुद्रात बोट उलटली, एकाचा मृत्यू!
चिनी घुसखोरांना क्लीन चिट देण्याचा आरोप
या दरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मे २०२०मध्ये चीनच्या घुसखोरीबाबत त्यांना क्लीन चिट दिल्याचा आरोप केला. भारतावर २० ऑक्टोहर १९६२ रोजी झालेले आक्रमण वास्तवात झाले होते. मे २०२० मध्येसुद्धा लडाखमध्ये चीनची घुसखोरी झाली, ज्यात ४० सैनिक हुतात्मा झाले आणि वास्तविक नियंत्रण रेषेच्या निर्धारित स्थितीचा भंग झाला. मात्र पंतप्रधानांनी १९ जून, २०२० रोजी चिनी घुसखोरीचा दावा फेटाळून लावून क्लीच चीट दिली. जयराम रमेश यांच्या मते, पंतप्रधानांच्या मते भारताची स्थिती कमकुवत आहे. देपसांग आणि डेमचोकसह दोन हजार चौरस फुटांच्या क्षेत्रात भारतीय सैनिकांच्या नियंत्रणाखाली नाही आणि चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला आहे.