आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात; हे मुद्दे गाजण्याची शक्यता

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात; हे मुद्दे गाजण्याची शक्यता

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. ३ मार्च ते २५ मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार असून ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणांच्या आगामी महानगरपालिका निवडणूका लक्षात घेता या अर्थसंकल्पाकडे साऱ्या राज्याचे लक्ष असणार आहे. दरम्यान अनेक मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अनेक विषयांवरून घेरण्याची तयारी केलेली आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत असताना काल, २ मार्च रोजी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांना कोणकोणत्या मुद्द्यांवरून घेरणार असल्याची कल्पना दिली. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे विरोधकांच्या निशाण्यावर असणार आहेत. ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मालिकांचा राजीनामा मागणीचा महत्त्वाचा मुद्दा या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये गाजणार आहे.

हे ही वाचा:

आता बाजारात येणार पतंजलीचे क्रेडिट कार्ड

‘मविआ सरकार राज्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार’

ॲपलने रशियामध्ये उत्पादनांची विक्री थांबविली, इतर सेवाही केल्या मर्यादित

खोट्या बातमीचा आधार घेत नाना पटोलेंची भाजपावर टीका

तसेच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपा नेते किरीट सोमय्यांवर झालेले आरोप, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरील कारवाई, केंद्रीय यंत्रणांचा वापर अशा अनेक मुद्द्यांवर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक. या अधिवेशनात तरी विधानसभेला अध्यक्ष मिळणार का? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील वीजेचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन यासह विविध मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.

Exit mobile version