कॉमेडियन श्याम रंगीला याचा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केल्यामुळे श्याम रंगीला प्रसिद्ध झाला होता. या महिन्याच्या सुरुवातीला त्याने वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती.
श्याम रंगीला याने १४ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याने अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. एका दिवसानंतर, भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर रंगीला याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याचे दिसून आले. रंगीला याने यापूर्वी उमेदवारी अर्ज भरण्यात अडथळे आणल्याचा आरोप केला होता. श्याम रंगीला याने १३ मे रोजी ट्विट केले की, ‘अनुमोदक होते, फॉर्मही भरला होता, पण कोणीही ते स्वीकारायला तयार नव्हते. आम्ही उद्या पुन्हा प्रयत्न करू.’
दुसऱ्या दिवशी, १४ मे रोजी, त्यांनी आरोप केला की अधिकारी त्यांच्या कॉलला प्रतिसाद देत नाहीत आणि ते उमेदवारी दाखल करू शकले नाहीत. काही तासांनंतर, त्याने नियमांनुसार सर्व आवश्यक सोपस्कार पूर्ण करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आपण यशस्वी झालो, असे कळवले होते. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज मात्र निवडणूक समितीने फेटाळला आहे.
श्याम रंगीला याने एक व्हिडीओ ट्विट करत ‘लोकशाहीची हत्या झाली आहे,’ असे नमूद केले आहे. ‘निवडणूक आयोगाने मी ही निवडणूक न लढवावी, असा खेळ केला होता. आज माझा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. जर त्यांना माझी उमेदवारी स्वीकारायची नव्हती, तर त्यांनी लोकांसमोर हे कृत्य का केले? हे आता जनतेसमोर स्पष्ट झाले आहे. माझ्या कागदपत्रांमध्ये काहीही उणीव नव्हती. मला निवडणूक लढवायला द्यायला हवी होती,’ असे रंगिला याने म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘एकला चलो रे’चा नारा देणाऱ्या ममता बॅनर्जी ‘इंडी’ आघाडीला बाहेरून पाठींबा देणार
उबाठाच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे कसे काय?
राहुल गांधी यांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ!
‘वीर सावरकरांची निंदा करणाऱ्यांना नकली शिवसेनेकडून डोक्यावर घेऊन नाचण्याचे काम’
‘काल मला दुपारी तीन वाजल्यानंतर प्रवेश देण्यात आला. आज, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मला सांगितले की दाखल करण्यासाठी आवश्यक असलेले शपथपत्र गहाळ आहे,’ असे त्याने सांगिले. तो १० मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र १४ मे रोजी दुपारी २.५८ वाजता तो दाखल करू शकला. त्या रात्री नंतर त्याने शपथपत्र सादर करण्याचा प्रयत्न केला पण डीएमने त्याला बाहेर काढले, असा दावाही त्याने केला.