एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला भाजपाने पाठिंबा जाहीर केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी आझाद मैदानावर जाऊन एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला. त्याचवेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या एका व्हिडीओचा दाखला देत भाजपवर टीका केली आहे. एसटी कर्मचारी आज ज्या मागण्या करत आहेत, त्या मागण्या घेऊन फडणवीस मुख्यमंत्री असताना मुनगंटीवार यांच्याकडे गेल्यावर त्या मागण्या नाकारण्यात आल्या होत्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
“माझ्या मतदारसंघांत एक कार्यकर्ता आला होता. त्यांनी मला निवेदन दिलं होतं. मतदार म्हणून तुम्ही इथले आमदार आहात तर भूमिका घ्या, विलीनीकरण तुम्ही करू शकता का? पण विलीनीकरण अर्थ खातं करू शकत नाही. त्यासाठी परिवहन विभाग आणि एसटीचा प्रस्ताव लागतो. तो अर्धवट व्हिडिओ दाखवला आहे. तिथे मला कुणीही शिष्टमंडळ घेऊन आला नव्हता. मी आजही सांगतो की मी विलीनीकरणाच्या बाजूने आहे. अर्थमंत्री म्हणून एसटीला सर्वात जास्त मदत मी केली आहे. तो कॅपिटल कर आहे त्यासंदर्भात मदत केली आहे. १०० च्या वरती बस स्थानक बांधण्यासाठी पैसे दिले आहेत. नवीन बस घेण्यासाठी पैसे दिले आहेत. तेजस्विनी बस ज्या आज आपण पाहत आहोत, त्यासाठी अर्थमंत्री म्हणून मी पैशाची तरतूद केली. त्यावेळी शिवसेना आणि भाजपाची युती होती.” असं मुनगंटीवार म्हणाले.
हे ही वाचा:
‘या’ महापुरुषाची जयंती ठरली जनजातीय गौरव दिवस
पराभवाच्या भीतीने शिवसेनेला हुडहुडी भरली
इंग्लंडला धूळ चारत न्यूझीलंड अंतिम फेरीत
दोन वर्ष MPSC परीक्षा नाही, पण मुदतवाढ मात्र वर्षभराचीच
“आज सरकारला प्रश्न सोडवायचा नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा मागवा. या जाहीरनाम्यात काय आश्वासन दिलं आहे. आम्ही एसटीचं विलीनीकरण करू असं स्पष्ट सांगितलं. आता भ्रम का निर्माण करत आहेत. माझा संबंध याविषयी येत नाही. एसटी कामगार कोणाकडे मागणी करत आहेत तर परिवहन मंत्र्याकडे. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी संगनमत केलं. आता त्यांची मती भ्रष्ट झाली आहे. त्यांनी विलिनीकरणाचा प्रस्ताव द्यावा आणि प्रश्न सोडवावा.” अशी मागणीही त्यांनी केली.
“३१ पेक्षा जास्त एसटी कामगारांच्या आत्महत्या झाल्या. त्यांची लढाई जगण्यासाठी सुरू आहे. एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी आहेत. त्यांना फक्त अडीच हजार बोनस देता, मग स्वाभाविकच त्यांच्याकडून मागणी होणारच.” असं मुनगंटीवार म्हणाले.