ठामपा उपायुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा…हकालपट्टीसाठी भाजपा आक्रमक

ठामपा उपायुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा…हकालपट्टीसाठी भाजपा आक्रमक

शिवसेना शासित ठाणे महानगरपालिकेतील उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. ठाण्यातील ग्लोबल कोविड सेंटर येथे काम करणाऱ्या एका कर्मचारी महिलेने हा आरोप केला आहे. या आरोपांवरून भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून केळकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी भाजपातर्फे करण्यात येत आहे.

ठाण्यातील बाळकूम परिसरात कार्यान्वित असलेल्या ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये पिडीत तरुणी काम करत होती. वर्षभरापूर्वी कंत्राटी पद्धतीवर या तरुणीला परिचारिका म्हणून कामावर घेण्यात आले होते. यावेळी रुग्णालयात काम करत असतानाच ठाणे महानगरपालिकेतील उपयुक्त डॉ.विश्वनाथ केळकर यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. यासंबंधीची तक्रार या पिडीत महिलेने प्रशासनाकडे तसेच विशाखा समितीकडे केली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. उलट या महिलेलाच कामावरून काढून टाकण्यात आले. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याचा ठपका या महिलेवर ठेवण्यात आला आणि तिला कामावरून कमी केले गेले.

हे ही वाचा:

‘हर घर जल’…२३ महिन्यांत ४.५ घरांना नळ जोडणी

आयुर्वेद, होमिओपॅथीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने दिली खुशखबर…महागाई भत्त्यात वाढ

काश्मीरमधील गावात जेव्हा पहिल्यांदाच वीज पोहोचते…

पण आता या प्रकरणात उपायुक्त केळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणात भारतीय जनता पार्टीकडून आक्रमक पवित्रा घेत केळकर यांना निलंबित करण्याची मागणी केली जात आहे. भाजपाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्रा वाघ, तसेच भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी ठामपा आयुक्त विपीन शर्मा आणि पोलीस आयुक्त यांची भेट घेतली. चित्र वाघ यांनी ट्विट करत या संबंधीची माहिती दिली आहे.

Exit mobile version