ठाणे शहराच्या मानपेचात आज आणखी एक तुरा खोवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पहिल्यावहिल्या दिव्यांग स्नेही संवेदना उद्यानाचे आज उदघाटन झाले आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार, १९ फेब्रुवारी रोजी हे लोकार्पण पार पडले. भाजपाचे राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांचा स्थानिक क्षेत्र विकास निधी आणि ठाणे महापालिका यांच्याद्वारे संयुक्तपणे हे उद्यान तयार करण्यात आले आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या नौपाडा येथील लोकमान्य टिळक उद्यानाचे नूतनीकरण करून ते आता दिव्यांग स्नेही उद्यान बनवण्यात आले आहे.
नूतनीकरण करून दिव्यांग स्नेही बनवलेल्या नव्या टिळक उद्यानामागील संकल्पनेचे वेगळेपण, यात राबविलेल्या अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांमध्ये आहे. पूर्णपणे अडथळेमुक्त अशा या उद्यानात, ब्रेल लिपीमध्ये सूचना उपलब्ध आहेत. या उद्यानात एक संवेदी विभाग देखील आहे जेथे दिव्यांग व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या अनुभवात्मक शिक्षणासाठी गंध, आवाज, स्पर्श आणि चव यासारख्या त्यांच्या जन्मजात संवेदी क्षमतांचा वापर करू शकतात. सुगंधी वनस्पतींनी युक्त असा एक स्वतंत्र विभाग, सुरक्षित स्पर्शासाठी काटे नसलेल्या वनस्पती, पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज असलेले पाणी आणि काही खाद्य वनस्पती ही या बागेतील वनस्पती विभागाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. दृष्टिहीनांसाठी एक संवेदी ट्रॅक देखील आहे जिथे ते चालताना वाळू, दगड, पाणी आणि गवत यांच्यातील फरक स्पर्शाने अनुभवू शकतात. बागेत प्रवेश करणे अर्थातच व्हीलचेअरसाठी अनुकूल आहे आणि उद्यानाच्या आतील रस्ते देखील एक्यूप्रेशर टाइल्स ने सुसज्ज आहेत.
हे ही वाचा:
… म्हणून विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर अकाऊंट केलं डिऍक्टिव्हेट
मिशन श्रीलंकासाठी भारतीय संघ जाहीर! कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १०० ‘किसान ड्रोन्स’ ना हिरवा झेंडा
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’
या उद्यानात ओपन एअर जिम सोबतच पियानो सारख्या ओपन एअर वाद्यांचा एक संच देखील आहे, ज्यावर दिव्यांग मुले आपला हात आजमावू शकतात. उद्यानात दिव्यांग स्नेही संस्थांसाठी एक स्वतंत्र जागा देखील उपलब्ध असेल, जिथे दिव्यांग मुलांच्या पालकत्वासाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन केले जाऊ शकते. तसेच, जागतिक पटलावर प्रसिद्ध अशा दिव्यांग वीरांबद्दल माहिती देणारी छायाचित्रे आणि त्यांचे संक्षिप्त जीवनचरित्र चितारलेली एक भिंत असलेला ‘हॉल ऑफ फेम’ या उद्यानाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे.
हे उद्यान ठाण्यातील दिव्यांग मंडळींना समर्पित असले, तरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांचे लोकार्पण होत असल्याने, ठाणे मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा झालेल्या महान स्वातंत्र्यसैनिक अनंत कान्हेरे यांसह इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ एक विशेष विभाग देखील उद्यानात बनवण्यात करण्यात आला आहे. हे उद्यान मुख्यत्वे दिव्यांग व्यक्तींसाठी असले तरी, ते सर्वांसाठी खुले आहे.