मुंबई महापालिकेसाठी माविआची साथ सोडत ठाकरेंचा स्वबळाचा नारा?

संजय राऊतांनी दिले संकेत

मुंबई महापालिकेसाठी माविआची साथ सोडत ठाकरेंचा स्वबळाचा नारा?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या निवडणुकीसाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभेत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता ठाकरे गट मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ठकारे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यासंबंधीचे विधान करून स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पुण्यातून माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा रेटा आहे. संजय राऊत यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा दाखला देत म्हटले की, “भाजपसोबत होतो त्यावेळीही आम्ही मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढली. गेल्या विधानसभेतही मुंबईतील जागा जास्त मिळाल्या असत्या तर आम्ही जिंकल्या असत्या. मुंबईत शिवसेनेची ताकद चांगली आहे. कार्यकर्त्यांचाही स्वबळावर लढण्याचा रेटा आहे,” असं म्हणत संजय राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत.

पुढे संजय राऊत म्हणाले की, “मुंबई महापालिकेवर आम्हाला शिवसेनेची सत्ता आणावीच लागेल. मुंबईचे तुकडे होऊ द्यायचे नसतील तर कोणत्याही परिस्थितीत सत्तेत यावे लागेल. मराठी माणसांवर कसे हल्ले सुरु झाले आहेत हे सगळे पाहत आहेत. मुंबई आम्ही स्वतंत्रपणे लढलो किंवा महापालिका निवडणुक स्वतंत्रपणे लढलो याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असा होत नाही. मुंबई ओरबाडली जाते आहे ती जर आमच्या हातून गेली तर मुंबई वेगळी केली जाईल. स्वतंत्रपणे लढण्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. यासंबंधी चर्चा सुरु आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा  : 

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय कुवेत दौऱ्यावर रवाना; आखाती देशाचा दौरा भारतासाठी महत्त्वाचा का?

कल्याण प्रकरण; धीरज देशमुख यांच्यावर हल्ला करणारे सुमित जाधव, दर्शन बोराडे अटकेत

बांगलादेशात तीन हिंदू मंदिरांतील मूर्तींची विटंबना; अलाल उद्दीनला ठोकल्या बेड्या

मॅग्डेबर्गमधील ख्रिसमस मार्केटमध्ये गाडी घुसून दोन ठार; सौदीच्या ५० वर्षीय डॉक्टरला अटक

“आम्ही आता पुन्हा पक्षबांधणीची तयारी सुरु केली असून कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासोबत बैठका सुरू आहेत. सरकारच्या मनात असलं तर १४ महापालिकांच्या निवडणुका लवकरच येतील. कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी आमच्या बैठका होत आहेत. विधानसभेच्या निकालावर चिंतन आणि मनन करण्यापेक्षा पुढे गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहे,” असंही संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version