“ठाकरे सरकार मृतवत आहे का? तसे असल्यास लवकरच तेरावं घालावं लागेल.” असे ट्विट करून भाजपा आमदार आणि मुंबई भाजपचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे. जयंत पाटील यांनी केंद्र सरकार झोपेत असल्याचा आरोप केला होता, त्यालाच उत्तर म्हणून भातखळकरांनी हे ट्विट केले आहे.
जयंत पाटील यांनी देशाची अर्थव्यवस्था खालावत चालली असताना केंद्र सरकार मात्र कुंभकर्णासारखे झोपले आहे असा आरोप केला होता. “शेतकरी आंदोलनात जवळपास तीनशे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बेरोजगारांची संख्या वाढत आहे, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खर्चाचे गणित कोलमडले आहे. तरीही केंद्र सरकारला जाग येत नाही.” असे जयंत पाटील म्हणाले होते. जागतिक निद्रा दिनाच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी ट्विट करून मोदी सरकारवर हा हल्ला चढवला होता.
हे ही वाचा:
एनआयएच्या ताब्यातील गाड्यांच्या फॉरेन्सिक तपासणीला सुरूवात
महावितरणाच्या अजब कारभारामुळे पुणे जम्बो कोविड सेंटरमधील बत्ती गुल
एटीएसला मिळणार सचिन वाझेचा ताबा?
वाझे प्रकरणातील प्रॅडोचा मूळ मालक शिवसेनेचाच
यावर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पाटील यांना टोला लागवणारे ट्विट केले आहे. सचिन वाझे प्रकरणाची राष्ट्रवादीच्या गृहमंत्यांनाच माहिती नसल्याचे चित्र विधानसभेत अनिल देशमुखांच्या उत्तरातून पाहायला मिळाले होते. याच मुद्द्यावरून अतुल भातखालकरांनी जयंत पाटील यांना टोला लगावला आहे. “राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना एवढी गाढ झोप लागली की आपल्या खात्यातील अधिकारी काय प्रताप करताहेत हे देखील कळले नाही. केंद्रावर दुगाण्या झाडण्यापेक्षा आधी त्यांना झोपेतून जागे करा. केंद्र सरकार निद्रिस्त असेल तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का? लवकरच तेराव घालावे लागेल.” असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.