राज्यात दंगली भडकावण्यात आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात महाविकास आघाडीचाच हात आहे, असा गंभीर आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. राज्यात होणारे हल्ले हे सरकारच्या पाठिंब्याने होत आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील दंगली हा रझा अकादमीने घडवून आणलेला सुनियोजित कट आहे. असंही ते म्हणाले. आज पत्रकार परिषद घेऊन नितेश राणेंनी हे आरोप केले.
आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद. https://t.co/OHGD2oE2sg
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 15, 2021
राज्यात दंगली झाल्या. त्याला रझा अकादमीच जबाबदार असल्याचं उघड झालं आहे. तरीही रझा अकादमीच्या एकाही माणसाला अटक करण्यात आलेली नाही. सर्व ‘मर्दानगी’ आमच्यावरच का दाखवली जाते? हिंमत असेल तर रझा अकादमीच्या अध्यक्षांना अटक करून दाखवा, असं आव्हानच राणे यांनी महाविकास आघाडीला दिलं आहे. राज्यात एवढी मोठी दंगल होते, हे महाराष्ट्राच्या गुप्तहेरखात्याचं अपयश नाही का? असा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर आमचा सरकारवर विश्वास नाही. येणाऱ्या काळात आम्ही केंद्रीय गृहमंत्री आणि एनआयएशी याबाबत चर्चा करणार आहोत. असंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक घाणेरडं राजकारण सुरू आहे. चुकीचं आणि खोटं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्याचे गृहमंत्री आणि अन्य मंत्र्यांची विधाने पाहा. हिंदू संघटनांमुळेच मोर्चे निघाले आणि त्यातून दंगल झाल्याचं चित्रं उभं केलं जात आहे. विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि भाजपामुळे दंगल झाल्याचं सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. आता १३ नोव्हेंबरच्या आधी काय घडलं हे सांगायला लागेल. १२ नोव्हेंबरला नांदेडमध्ये मोर्चा निघाला. हा केवळ मोर्चा नव्हता. तो सुनियोजित मोर्चा होता. त्याचे आधीच सगळीकडे पोस्टर लागले होते. असंही राणे म्हणाले.
रझा अकादमीने १२ तारखेला मोर्चा काढला होता. त्रिपुराला तथाकथित मशीद जाळल्याचं कारण देत आंदोलन करण्यात येत असल्याचं सांगितलं गेलं. खरंच अशी कुठली घटना त्रिपुरात घडली का? एक तरी फोटो दाखवा. माझं खुलं आव्हान आहे. याबाबत रझा अकादमी आणि महाविकास आघाडीने उत्तर द्यावं. असं आव्हान नितेश राणेंनी केलं.
मोर्चा काढण्याचं कारणच खोटं असताना मोर्चा काढला तरी कसा? मुद्दा अस्तित्वातच नसताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्यात आली. राज्यातील मंत्री यावर काहीच बोलत नाहीत. रझा अकादमी ही एक अतिरेकी संघटना आहे. त्यांच्या स्थापनेपासूनच त्यांचे विचार आणि कार्यप्रणालीही इस्लामिक कट्टरपंथीय राहिली आहे. कट्टरपंथीयांचा समाजाशी काय संबंध? या संघटनेचं मूळ तालिबानमध्ये आहे. याच रझा अकादमीने ट्रिपल तलाकला विरोध केला होता. याच संघटनेने व्हॅक्सिनलाही विरोध केला होता. तरीही ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्यावर कोणी काहीच कसं बोलत नाही? असा सवालही राणेंनी केला आहे.
हे ही वाचा:
अनिल देशमुख २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच
काँग्रेस सत्तेत असताना भारतात अंशतः ‘इस्लामिक राष्ट्र’ होते
हिंदू खलनायक दाखवले जातात तेंव्हा असे प्रश्न का पडत नाहीत?
बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया
या संघटनेनेच महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग केला होता. भिवंडीत दोन पोलीस मारले गेले, त्यातही त्यांचा हात होता. याच संघटनेने बाळासाहेब ठाकरेंना सर्वात जास्त विरोध केला होता याची आठवण आहे का? हिंदू संघटनांनी आंदोलन भडकवलं असं म्हणता मग रझा अकादमीने काय केलं ते कोण बोलणार? असा सवाल करतानाच उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये दंगे कोणी भडकवले याची माहिती संजय राऊतांनी घ्यावी. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.