माथाडी कामगारांचे नेते आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या नरेंद्र पाटील यांनी माथाडींच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगार बोंबलून बोंबलून थकलो तरी आमची मागणी पूर्ण होत नसल्याने यात शंभर टक्के राजकारण होत असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. माथाडी कामगार हे सर्वपक्षीय असल्याने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगून देखील ते गांभीर्याने घेत नसल्याने भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या चारही पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांना आणि माथाडी बोर्डाचे ३६ चेअरमन यांना पत्र व्यवहार केला असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. बाजार समितीच्या सर्व घटकांची कृती समिती तयार करण्यात येणार असून बाजार आवारातील सर्व घटकांच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती प्रयत्न करणार आहे. शिवाय, माथाडी कामगारांचं अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्री आणि संबंधित अधिकारी यांची जमेल त्या मार्गाने भेट घेऊन हे प्रश्न गांभीर्याने घ्यावेत, अशी मागणी केलीय. जर सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर येत्या आठवड्यात कशा प्रकारे आंदोलने करायची त्याची दिशा ठरवून एकमताने आंदोलने करण्याच्या भूमिकेत बाजार समितीचे घटक विचार करत आहेत, असं नरेंद्र पाटील म्हणाले.
हे ही वाचा:
इस्राएलनंतर आता अमेरिकाही मास्क मुक्तीकडे?
सेहवाग देतोय कोविड रुग्णांना मोफत जेवण
माथाडी व बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या घटकांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करावे. रेल्वे, परिवहन बस व रक्षा कवच यामध्ये समाविष्ट करावे. २०२० मध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्या कामगारांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी कृती समिती स्थापन करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. या निवेदनाची जर सरकारने योग्य दाखल घेतली नाही तर आम्ही आंदोलन करून आमच्या हक्कासाठी लढू, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला.