निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्हं आणि शिवसेना हे नाव गोठवल्यानंतर आता ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.
शनिवार, ८ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाकडून ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आता ठाकरे गट आणि शिंदे गट यांना वापरता येणार नाही. तसेच दोघांनाही शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी. तसेच या प्रकरणावर आजचं सुनावणी घ्या, अशी मागणीही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने कागदपत्र न तपासता निर्णय दिला आहे. तसेच युक्तिवाद करण्याची संधी दिलीच नाही, असे आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहेत.
हे ही वाचा:
शिंदे गट ‘या’ तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल
चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच
उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर
दरम्यान ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तीन चिन्ह आणि तीन नाव सादर केली आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन नावांच्या पर्यायाचा समावेश आहे. तर त्रिशूल, उगवणारा सूर्य आणि मशाल या तीन चिन्हांना सादर केलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हांना प्राधान्य देण्यात आलं असल्याची माहिती आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत शिंदे गट या चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार असल्याची माहिती आहे.