राज्यातील विधानसभेची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू असून महायुतीकडून काही उमेदवारांच्या नावांची घोषणाही करण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्याप जागा वाटपाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. अशातच संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गट यांच्यातील युती तुटणार असल्याची माहिती आहे. जागावाटपात काँग्रेसशी सुरू झालेल्या संघर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी तुटेपर्यंत ताणू नका, असे आवाहन केले होते. पण आता त्यांच्यात आणि संभाजी ब्रिगेडमध्येच जागावाटपावरून तणाव निर्माण झाल्याने अखेर त्यांच्यातील युती तुटली. संभाजी ब्रिगेड राज्यात ५० पेक्षा जास्त उमेदवार जाहीर करणार असून यामुळे त्यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटासोबत अडीच वर्षे असणारी संभाजी ब्रिगेडची युती तुटली असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठकारे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीबाबत ठाकरे गटाने संभाजी ब्रिगेड संघटनेला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ही युती आता तुटली असून राज्यात संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार आहे. राज्यात ५० पेक्षा अधिक उमेदवार देणार असल्याची माहिती ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि मुख्य प्रवक्ते डॉ गंगाधर बनबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे ही वाचा :
बारामती मधून अजित पवार, येवल्यातून भुजबळ, परळीतून मुंडे तर कागलमधून हसन मुश्रीफ!
पुस्तक विकण्यासाठी आपली इज्जत विकली; बबिता फोगट यांची टीका
‘बटेंगे तो कटेंगे’ आशयाचे मुंबईत लागले पोस्टर्स
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : हत्येपूर्वी स्नॅपचॅटचा वापर झाला
मनोज आखरे म्हणाले की, संभाजी ब्रिगेड गेल्या ३५ वर्षांपासून शिव- फुले- शाहू- आंबेडकर ही विचारधारा घेऊन कार्यरत आहे. दोन वर्षांपूर्वी ठाकरे गटासोबत संभाजी ब्रिगेडची युती झालेली होती. लोकसभा निवणुकीत एकही जागा न घेता संभाजी ब्रिगेडने ठाकरे गट आणि मविआचा प्रचार केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधानसभेला संभाजी ब्रिगेडला त्यांच्या कोट्यातून किमान चार ते पाच जागा देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु विधानसभेच्या जागा वाटपात आम्हाला सन्मानपूर्वक स्थान आणि जागा दिल्या नसल्याचा आरोप आखरे यांनी केला आहे. ठाकरे गटाबरोबरची युती तोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.