महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी जागा वाटप पूर्ण झाले असले तरीही अंतर्गत धुसपूस सुरू असल्याचे चित्र आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांचा पत्ता कट होऊन सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे . यामुळे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर हे नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना ‘मातोश्री’वरून बोलावणे आले होते. मात्र, त्यांनी याकडे पाठ फिरवत बंडखोरी केली आहे.
नाशिकच्या जागेवरून डावलल्यानंतर विजय करंजकर नाराज होते. त्यांच्या नाराजीनंतर त्यांना ‘मातोश्री’वरून दोन वेळेस बोलावण्यात आले होते. मात्र, दोन्ही वेळेस विजय करंजकर यांनी मातोश्रीकडे पाठ फिरवली. अशातच आता विजय करंजकर यांनी आज बंडखोरी केली आहे. विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आणि महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत.
विजय करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेवरून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. महाविकास आघाडीकडून त्यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी काहीही प्रतिक्रिया न देता बघ्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून त्यांनी महायुतीतून देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. विजय करंजकर हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या.
हे ही वाचा:
ऑनलाईन फसवणुकीसाठी गुन्हेगार लढवत आहेत नवी शक्कल!
‘सीबीआय’ भारतीय संघराज्याच्या नियंत्रणाखाली नाही
पाकिस्तानातील सिंधी समाज करणार ‘राम लल्लाचा जयघोष’
पॅलिस्टिनी समर्थन आंदोलनात दोन हजारांहून अधिक जणांना अटक!
दरम्यान, महायुतीतून शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर शुक्रवारी विजय करंजकर यांनी अपक्ष उमदेवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीला दुहेरी विरोधकांचा सामना करावा लागणार आहे.